INDvsAUS: उमेश यादवच्या बचावाला बुमराह धावला
ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता न आल्याने उमेश यादवची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
विशाखापट्टणम : भारताचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराह ऊमेश यादवच्या मदतीसाठी धावून आला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता न आल्याने उमेश यादवची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये १६ रनची गरज होती. १९ वी ओव्हर बुमराहने टाकली. या ओव्हरमध्ये बुमराहनं अवघ्या २ रन देऊन मॅच मधील रंगत वाढवली. अखेरच्या ओव्हरमध्ये उमेश यादवने १४ रन दिल्याने तो क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
या सर्व प्रकारावर बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे. 'असं होणं साहजिक आहे. कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करणे फार आव्हानात्मक असते. ही मॅच कोणत्याही क्षणी कुठल्याही टीमकडे वळू शकली असती. तर क्वचित वेळेस मॅच जिंकण्याची दोन्ही टीमला संधी असते.' असे बुमराह म्हणाला.
'प्रत्येक खेळाडू हा आपल्याकडून चांगली खेळी व्हावी, यासाठीचे प्रयत्न करत असतो. आपल्याकडून शक्य तितके प्रयत्न तो करतो. प्रत्येक खेळाडू हा त्याने आखलेल्या योजनेनुसार खेळतो. काही वेळा तो बॉलर आपल्या योजनेत यशस्वी होतो, तर कधी अपयशी देखील होतो. यासाठी चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. अखेरच्या बॉलवर भारताचा विजय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण तसे होऊ शकले नाही', अशी खंत बुमराहनं व्यक्त केली.
'ऑस्ट्रेलिया टॉस जिंकल्यानंतर, त्यांच्याकडे बॉलिंग किंवा बॅटिंग असे दोन पर्याय होते. पण पहिल्या इनिंग मध्ये भारताला बॅटिंग करावी लागल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी आकडा देण्याचे आव्हान होते. जेव्हा आपल्याला विजयासाठी एखादा आकडा माहित असतो, तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असते. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेला आकडा हा फार लहान होता. पण आम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॉटिंग करताना ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक विजयी लक्ष देण्याच्या प्रयत्नातून खेळत होतो.' अशी प्रतिक्रिया बुमराहनं दिली.
मॅक्सवेल चांगला खेळला- फिंच
ऑस्टेलियाचा कॅप्टन एरॉन फिंच याने ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीचे कौतुक केले आहे. मॅक्सवेलने ४३ बॉलमध्ये ५६ रनची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या पाया रचला.