Ind vs WI: भारताकडून विंडीजचा दारूण पराभव; १०० धावांत उडवला खुर्दा
बुमराह ५० बळी घेणारा सर्वाधिक जलद गोलंदाज ठरला आहे.
सेंट जोन: भारतीय संघाने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३१८ धावांनी विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य राहणे या विजयाचे शिल्पकार ठरले. अजिंक्य राहणे यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजपुढे विजयासाठी ४१९ धावांचे लक्ष्य ठरले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला विंडीजचा संघ बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे बिलकूल टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे भारताने विंडीजचा अवघ्या १०० धावांमध्ये खुर्दा उडवला.
बुमराहने आठ षटकांमध्ये अवघ्या सात धावा देऊन विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडला. या कामगिरीमुळे तो ५० बळी घेणारा सर्वाधिक जलद गोलंदाज ठरला आहे. इतर भारतीय गोलंदाजांनीही बुमराहला सुरेख साथ दिली. अनुभवी मोहम्मद शामीने दोन तर ईशांत शर्माने तीन बळी मिळवले. त्यामुळे विंडीजचा संपूर्ण संघ २६.५ षटकांत अवघ्या १०० धावाच करू शकला. या विजयाबरोबरच भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
चौथ्या डावात विंडीजकडून केमर रोच( ३८) मिग्युएल कमिन्स (नाबाद १९) आणि रोस्टन चेस (१२) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. विंडीजची आघाडीची फळी तर पत्त्यासारखी कोसळली. बुमराहने सुरुवातीलाच क्रेग ब्रेथवेट आणि जॉन कॅम्पबेल यांचे बळी मिळवत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. यानंतर त्याने डॅरेन ब्राव्हो, शाई होप्स आणि जेसन होल्डर यांनाही माघारी धाडत विंडीजला पुरते नामोहरम केले.
स्टोक्सची एकाकी झुंज, तिसऱ्या ऍशेसमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय
या विजयामुळे विराट कोहलीने भारताचा सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार या महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत २७ कसोटी सामने जिंकले आहेत.