लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला होता. त्यामुळे ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. पण तिसरी टेस्ट मॅच सुरु होण्याच्या आधी भारतीय टीमला दिलासा मिळाला आहे. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह तिसरी टेस्ट खेळण्यासाठी फिट झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचदरम्यान बुमराहच्या अंगठा फ्रॅक्चर झाला होता. इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर वनडे सीरिजदरम्यान बुमराह भारतात परत आला होता. टेस्ट सीरिजमध्ये निवड झाल्यानंतर बुमराह पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. टेस्ट सीरिजदरम्यान बुमराह चेम्सफोर्ड, बर्मिंघम आणि लॉर्ड्सवर सराव करत होता. पण सराव करताना बुमराहच्या बोटाला प्लास्टर होतं. पण आता बुमराहला फिट घोषित करण्यात आलं आहे.


अश्विन-पांड्याही फिट


दरम्यान आर. अश्विन आणि हार्दिक पांड्याही फिट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान बॅटिंग करताना या दोघांच्या हाताला बॉल लागला होता.


विराटबद्दल निर्णय नाही


कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसवर मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा काही भाग आणि चौथा दिवस विराट कोहली फिल्डिंगला आला नव्हता. विराटच्या पाठीला दुखापत झाली आहे. फिल्डिंगला न आल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये विराटला त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येता आलं नव्हतं. दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर तर विराट पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. 


दरम्यान तिसऱ्या टेस्टसाठी आपण फिट होऊ, असा विश्वास विराटनं व्यक्त केला होता. मला पाठीच्या खाली दुखापत झाली आहे. कामाचं ओझं आणि जास्त क्रिकेट खेळल्यामुळे ही दुखापत पुन्हा सुरु झाल्याचं विराट म्हणाला.