भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयांक  यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतींमधून सावरत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मयांक यादव फक्त चार सामने खेळला होता. मात्र या चार सामन्यातील गोलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मयांकने  6.99 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या. त्याने अत्यंत सहजपणे ताशी  150 किमीचा टप्पा गाठला होता. ताशी 156.7 किमी हा त्याचा सर्वोत्तम चेंडू आहे. दरम्यान मयांक यादवला भारतीय संघात संधी मिळणार की नाही याची काही शाश्वती नाही असे बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले आहेत. मयंकच्या भारतीय संघात समाविष्ट होण्याच्या शक्यतेबद्दल विचारलं असता जय शाह यांनी हे उत्तर दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मयांक  यादवबद्दल मी तुम्हाला कोणतेही उत्तर देऊ शकत नाही कारण तो संघात असेल की नाही याची शाश्वती नाही. पण तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत. तो सध्या एनसीएमध्ये आहे", असे  जय शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.


या वर्षाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज मयांकने लखनौ सुपरजायंट्स (एलएसजी) संघातून खेळत आयपीएलमधे पदार्पण केले होते. आपल्या गोलंदाजीने त्याने सर्वांना प्रभावित केले होते. पण दुखापतीमुळे चार सामने खेळल्यानंतर त्याला बाहेर बसावे लागले होते. 21 वर्षीय मयांकला  2022 मधील लिलावात LSG ने 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. परंतु त्यानंतर दुखापतीमुळे त्याची जागा अर्पित गुलेरियाने घेतली होती. त्याला आयपीएल 2024 मध्ये संधी मिळाली, परंतु त्या आवृत्तीतही दुखापत  झाली.


आपल्या टी 20 कारकिर्दीत त्याने 14 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. तर अ श्रेणीतील  कारकिर्दीत मयांकने  17 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये तो  दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो.


या वर्षी एप्रिलमध्ये, मयांकने IPL 2024 मधील  सर्वात वेगवान चेंडू टाकला. स्पर्धेत आपली  जबरदस्त कामगिरी सुरू ठेवत, त्याने लखनौ सुपरजायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर शानदार विजय मिळवून देण्यासाठी तीन विकेट्स घेतल्या होत्या.