ENG vs AUS 2nd Test: दुसऱ्या अॅशेस टेस्ट दरम्यान मैदानात राडा; बेअरस्टोने उचलून बाहेर फेकलं; पाहा Video
Ashes Series : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गोंधळ झाला. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात आंदोलकांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलंय.
ENG vs AUS 2nd Test, Ashes Series: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. अॅशेस मालिकेतील (Ashes 2023) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, दोन आंदोलकांनी राडा घातल्याने मैदानावर बराच वेळ गोंधळ उडाल्याचं समोर आलं होतं. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होताच आंदोलकांनी थेट खेळाडूंपर्यंत मजल मारली आणि राडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेअरस्टो याने आंदोलकाला उचललं आणि थेट मैदानाबाहेर नेऊन सोडलं. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ओपनिंगसाठी उतरले, त्यावेळी आंदोलकांनी गदारोळ सुरू केला. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आंदोलकांनी मैदानात तेल ओतण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पाहा Video
ऑस्ट्रेलियाची 1-0 ने लीड
अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, अॅशेल मालिका दोन्ही संघासाठी मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. वर्ल्ड कपपेक्षा जास्त तयारी या मालिकेची केली जाते. अशातच आता दुसरा सामना जिंकून इंग्लंड बरोबरी करणार का? की ऑस्ट्रेलिया दुसरा सामना जिंकून 2-0 ने आघाडी घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (डब्ल्यू), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (क), जॉनी बेअरस्टो (डब्ल्यू), स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जोश टंग, जेम्स अँडरसन.