जॉन्टी रोड्स म्हणतो, हे आहेत जगातले सर्वोत्तम ५ फिल्डर, भारतीय पहिल्या क्रमांकावर
जगातला सर्वोत्तम फिल्डर कोण? असं विचारलं तर आजही प्रत्येक क्रिकेट रसिक दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सचं नाव घेईल.
मुंबई : जगातला सर्वोत्तम फिल्डर कोण? असं विचारलं तर आजही प्रत्येक क्रिकेट रसिक दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सचं नाव घेईल. ९० च्या दशकामध्ये जॉन्टीनं फिल्डिंगमध्ये त्याचं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आज इतक्या वर्षानंतर क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले, तरी फिल्डिंग म्हणलं की सगळेच खेळाडू जॉन्टी रोड्सला गुरू मानतात. १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये जॉन्टीनं पक्ष्यासारखा उडून पाकिस्तानच्या इंजमाम उल हकला केलेलं रन आऊट आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. याच जॉन्टी रोड्सनं आता जगातल्या आत्तापर्यंतच्या ५ सर्वोत्तम फिल्डरची नाव सांगितली आहेत. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉन्टी रोड्स बोलत होता.
४९ वर्षांच्या जॉन्टी रोड्सनं २००३ सालच्या वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या रोड्स हा वेगवेगळ्या टीमचा फिल्डिंग प्रशिक्षक आणि सल्लागार आहे. जॉन्टीच्या सर्वोत्तम ५ फिल्डरमध्ये २ दक्षिण आफ्रिकेचे, एक ऑस्ट्रेलियाचा, एक इंग्लंडचा आणि एक भारताचा खेळाडू आहे. जॉन्टी रोड्सनं त्याच्या या यादीमध्ये भारतीय खेळाडूला पहिलं स्थान दिलं आहे.
आयसीसीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जॉन्टी रोड्स म्हणतो, 'सध्याच्या जमान्यामध्ये अनेक क्रिकेटपटू हे सर्वोत्तम फिल्डर आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा एन्ड्रयू सायमंडस माझ्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. सायमंड्स हा फक्त ३० यार्डाच्या आतच नाही, तर सीमारेषेवरही सर्वोत्तम फिल्डिंग करायचा. सायमंड्सचा खांदाही मजबूत होता.' मी मात्र फक्त ३० यार्डाच्या आतमध्येच फिल्डिंग करायचो, असं रोड्सनं कबूल केलं.
सर्वोत्तम फिल्डरच्या यादीत चौथ्या क्रमांकवर रोड्सनं दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सला स्थान दिलं आहे. 'हर्षल गिब्स हा सर्वोत्तम फिल्डर होता. गिब्सबरोबर बॅकवर्ड पॉईंटला फिल्डिंग करताना मजा यायची', अशी प्रतिक्रिया जॉन्टीनं दिली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जॉन्टीनं इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलींगवूडचं नाव घेतलं आहे. मी आणि कॉलींगवूड दोघंही एकाच ठिकाणी फिल्डिंग करायचो, असं रोड्सनं सांगितलं.
मागच्यावर्षी मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेला दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स जॉन्टीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'दक्षिण आफ्रिकेचा फिल्डिंग प्रशिक्षक असताना एबी जेव्हा विकेट कीपिंग करायचा, तेव्हा मी नाराज व्हायचो. चांगला फिल्डर असतानाही एबीनं हातात ग्लोव्हस घालणं मला पटायचं नाही', असं वक्तव्य जॉन्टीनं केलं आहे.
जॉन्टी रोड्सनं त्याच्या सर्वोत्तम ५ फिल्डरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर सुरेश रैनाला स्थान दिलं आहे. 'मी सुरेश रैनाचा मोठा चाहता आहे. भारतामधली मैदानं ही टणक असतात. त्यामुळे अशा मैदानांमध्ये फिल्डिंग करणं कठीण असतं. असं असतानाही दुखापतीची काळजी न करता सुरेश रैना फिल्डिंगसाठी झेप घेण्यासाठी अजिबात कचरत नाही. यामुळे सुरेश रैना खास आहे. तसंच सुरेश रैना कोणत्याही ठिकाणी फिल्डिंग करू शकतो, असं जॉन्टी रोड्सला वाटतं.