मुंबईच्या विजयानंतर न्यू़ड डान्स करणाऱ्या खेळाडूनंच मुंबईला हरवलं!
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबईविरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये राजस्थाननं मुंबईचा ७ विकेटनं पराभव केला. पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं राजस्थानसमोर १६९ रनचं आव्हान ठेवलं. राजस्थाननं हे आव्हान १८ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानच्या या विजयामुळे मुंबईचं प्ले ऑफला जाण्याचं आव्हान आणखी खडतर झालं आहे. तर राजस्थान मात्र अजूनही प्ले ऑफला क्वालिफाय व्हायच्या शर्यतीत कायम आहे. या मॅचमध्ये बटलरनं ५३ बॉलमध्ये ९४ रनची खेळी केली. यामध्ये ९ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. या धडाकेबाज खेळीमुळे बटलरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
बटलरचा मुंबईसाठी न्यूड डान्स
मागच्या वर्षी जॉस बटलर हा मुंबईकडूनच खेळला होता. पण यंदाच्या वर्षी मुंबईनं त्याला रिटेन केलं नाही तसंच लिलावामध्येही विकत घेतलं नाही. राजस्थाननं मात्र बटलरवर बोली लावत त्याला टीममध्ये घेतलं. मागच्या वर्षी आयपीएल फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा एका रननं पराभव केला होता. मुंबईच्या या विजयानंतर बटलरनं न्यूड डान्स केला होता. मागच्या वर्षी सुरुवातीला बटलर मुंबईकडून खेळला पण इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी तो आयपपीएल अर्धवट सोडून गेला होता.
बटलरचं रेकॉर्ड
मागच्या वर्षी मुंबईच्या विजयाचा जल्लोष करणारा खेळाडू यावर्षी मुंबईच्या पराभवाला जबाबदार ठरला आहे. बटलरला रिटेन न केल्याचं दु:ख मुंबईच्या टीमला जाणवत असेल. या आक्रमक अर्धशतकाबरोबरच बटलरनं अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. तर वीरेंद्र सेहवागच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली. सेहवागनं २०१२ साली लागोपाठ ५ मॅचमध्ये अर्धशतकं लगावली होती. या वर्षी बटलरनंही लागोपाठ ५ मॅचमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत. या दोघांशिवाय झिम्बाब्वेचा हेमिल्टन मसकादझा आणि पाकिस्तानच्या कामरान अकमलनंही टी-20मध्ये लागोपाठ ५ अर्धशतकं केली आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये ५०० रन करणारा बटलर पाचवा खेळाडू बनला आहे. बटलरनं १२ इनिंगमध्ये १५३.७७च्या स्ट्राईक रेटनं ५०९ रन केल्या आहेत. बटलर ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये ऋषभ पंत, केन विलियमसन, लोकेश राहुल आणि अंबाती रायडूपेक्षा मागे आहे. बटलरनं मागच्या पाच इनिंगमध्ये ६७, ५१, ८२, ९५ आणि ९४ रन केले आहेत.
आयपीएल इतिहासामध्ये लागोपाठ दोन इनिंगमध्ये ९० पेक्षा जास्त आणि १०० पेक्षा कमी रन बनवणारा बटलर हा पहिला खेळाडू बनला आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बटलरनं ९५ रनची आणि मुंबईविरुद्ध ९४ रनची खेळी केली होती.