लंडन : लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००५मध्येही भारत फायनलमध्ये पोहोचला होता मात्र त्यावेळी ऑस्ट्रेलियाने हरवले होते. लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा हा तिसरा वनडे सामना असणार आहे. २५ ऑगस्ट २०१४मध्ये या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला होता मात्र पावसामुळे तो रद्द करावा लागला. 


लॉर्ड्सचे मैदान भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्यासाठी लकी ठरलेय. लॉर्ड्सच्या मैदानावर १९८३मध्ये भारताने इतिहास रचला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकपचे जेतेपद मिळवले होते. 


सौरव गांगुलीसाठीही हे मैदान लकी ठरलेय. २००२मध्ये नेटवेस्ट सीरीजमध्ये भारताला लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल खेळण्याची संधी मिळाली होती. हा सामना इंग्लंडविरुद्ध होता. भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. 


या दोन्ही कर्णधारासाठी हे मैदान लकी ठरल्याने आता उद्या मिताली राजसाठीही हे मैदान कितपत लकी ठरते हे पाहावे लागेल. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा १८६ धावांनी धुव्वा उडवल्याने भारताचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. त्यामुळे इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीये.