Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim From Dressing Room: भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) किस्से कायमच चर्चेत असतात. खेळाडूंमध्ये झालेल्या गप्पा, वाद, हामरीतुमरी, रॅगिंग, मस्ती आणि गंमतीजंमती खेळाडूंच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी ड्रेसिंग रुमशी निगडीत असतात. मात्र 17 एप्रिल 1986 रोजी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये (Team India Dressing Room) असं काही घडलं की हा प्रकार कायमचा सगळ्यांच्या लक्षात राहिला. दुबईमधील शारजाह स्टेडियमवर (Sharjah Stadium, Dubai) आशिया चषकातील (Asia Cup) भारत पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी हा प्रकार घडला होता. भारतीय ड्रेसिंग रुमममध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) पाऊल ठेवलं आणि भारतीय खेळाडूंना एक ऑफर दिली. मात्र त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या कपिल देव (Kapil Dev) यांनी दाऊदला ड्रेसिंग रुममधून हकलून लावलं. या संपूर्ण घटनेबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनीच सांगितला आहे. काही काळापूर्वी एका मुलाखतीमध्ये वेंगसरकर यांनी हा किस्सा सांगितला होता. त्यानंतर कपिल देव यांनी ही घटना खरोखर घडल्याचं सांगितलं होतं.


दाऊद ड्रेसिंग रुममध्ये येऊन काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेंगसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सामन्याच्या आदल्या दिवशी दाऊद इब्राहिम भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आला होता. बॉलीवूडमधील विनोदी कलाकार महमूदसुद्धा त्याच्याबरोबर होते. दाऊदने ड्रेसिंग रुममध्ये येऊन खेळाडूंना सांगितलं की, "उद्या जर पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघ पराभूत झाला तर मी प्रत्येक खेळाडूला टोयोटा कार देईन." दाऊदने दिलेली ऑफर ऐकून सर्व खेळाडू गोंधळून गेले आणि एकमेकांकडे पाहू लागले.


कपिल देव यांनी दाऊला पाहिल्यावर काय म्हटलं?


खेळाडू गोंधळात असतानाच पत्रकारांशी संवाद साधून भारतीय संघाच्या कर्णधारपदी असलेले कपिल देव ड्रेसिंग रुममध्ये दाखल झाले. कपिल यांनी दाऊदकडे लक्षही दिलं नाही. त्यांनी थेट ड्रेसिंग रुममध्ये येऊन मला खेळाडूंशी चर्चा करायची आहे असं मोठ्याने सांगितलं. सामान्यपणे कपिल देव यांना ड्रेसिंग रुममध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती फारशी रुचायची नाही. त्यामुळेच कपिल देव यांनी महमूद यांना आदराने तुम्ही रुमच्या बाहेर जावं असं सांगितलं. महमूद यांना ओळखत असल्याने कपिल देव यांनी त्यांना आदराने बाहेर जाण्यास सांगितलं. नंतर त्यांनी दाऊदकडे पाहिलं आणि त्याला, "चल बाहेर निघ" असं म्हणाले, अशी माहिती वेंगसरकर यांनी दिली. 


कपिल देव यांनी किस्सा सांगताना म्हटलं की, "मला कोणीतरी सांगितलं..."


खरोखर ही घटना घडली होती की नाही याबद्दल कायमच क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा होत असतानाच कपिल देव यांनी कधीच असं घडलं नाही असं स्पष्टपणे मान्य केलं नाही. उलट 'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारताच्या या माजी कर्णधाराने हाच किस्सा वेगळ्याप्रकारे सांगितला होता. "हो मला आठवतयं की शारजाहमध्ये एका सामन्यादरम्यान एक व्यक्ती ड्रेसिंग रुममध्ये आली होती आणि तिला खेळाडूंबरोबर चर्चा करायची होती. मात्र मी त्या व्यक्तीला लगेच ड्रेसिंग रुमबाहेर जाण्यास सांगितलं कारण बाहेरच्या लोकांना ड्रेसिंग रुममध्ये येण्याची परवानगी नव्हती. त्या व्यक्तीने माझं म्हणणं ऐखलं आणि काहीच न बोलता ती व्यक्ती ड्रेसिंग रुमबाहेर पडली. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की ही व्यक्ती मुंबईमधील तस्कर असून तिचं नाव दाऊद इब्राहिम असं आहे. यापुढे काहीच घडलं नव्हतं," असं कपिल देव म्हणाले होते.


"दिलीप असं सांगत असेल तर..."


या व्यक्तीने खेळाडूंना टोयोटा गाडी देण्याची ऑफर दिल्याची कल्पना मला नव्हती असंही कपिल देव यांनी सांगितलं. "माझ्या माहितीनुसार असा कोणताही प्रस्ताव त्यावेळी देण्यात आला नव्हता. अर्थात जर दिलीप असं सांगत असेल तर त्याला नक्कीच याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे," असं कपिल देव म्हणाले होते. वेंगसरकर यांनी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये दाऊदच्या या भेटीसंदर्भातील विधान केलं होतं. "तुम्ही लोकांनी मालिका जिंकली तर मी तुम्हा सगळ्यांना एक-एक टोयोटा कार देईल. मात्र संघाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही," असं वेंगसरकर म्हणालेले.


त्या पुस्तकातही आहे उल्लेख


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव जयंत लेले यांनीही आपल्या 'आय वॉज देअर- मेमोयर्स ऑप द क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर' या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. या पुस्तकातील एका धड्यामध्ये टोयोटा कारची ऑफर देण्यात आल्याचा उल्लेख लेलेंनी केला आहे. "भारतीय संघाने मालिका जिंकली तर मी अधिकाऱ्यांबरोबरच संघातील प्रत्येक खेळाडूला टोयोटा कार भेट म्हणून देईन" असं ती व्यक्ती म्हणाल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे.