अर्जुन तेंडुलकरवर `या` गोष्टीचा दबाव, कपील देवकडून खुलासा
कपिल देव यांनी अर्जुनबाबत वक्तव्य केलं आहे. जो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले होते, या मोसमात तो डेब्यु करेल आणि आपला खेळ देखील दाखवेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. अर्जुनला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. ज्यानंतर कपिल देव यांनी अर्जुनबाबत वक्तव्य केलं आहे. जो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
कपिल देव म्हणाले की, ''अर्जुनवर त्याच्या आडनावामुळे थोडा अधिक दबाव असेलच, परंतु त्याला स्वतःचा खेळ खेळावा लागेल.''
कपिल देव एका इव्हेंटमध्ये म्हणाले की, ''प्रत्येकजण त्याच्याबद्दल का बोलत आहे? कारण तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. पण त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्या आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी करू नका.''
कपिल देव म्हणाले की, तेंडुलकर आडनाव असणे अर्जुनसाठी फायदेशीर आणि नुकसानकारक दोन्ही आहे.
डॉन ब्रॅडमन यांच्या मुलालाही आपल्या वडिलांच्या नावाचा दबाव सहन न झाल्यामुळे, त्याने त्याचे नाव बदलले.
कपिल म्हणाले की, ''अर्जुनवर जास्त दबाव टाकू नका, तो खूप तरुण आहे. त्याला वेळ द्या आणि त्याला त्याचा खेळ खेळू द्या''
पुढे कपिल देव म्हणाले की, ''मी अर्जुनला एकच सल्ला देऊ इच्छितो की, तुझ्या खेळाचा आनंद घे. त्याला कोणाला ही काही सिद्ध करण्याची गरज नाही, जर तु तुझ्या वडिलांचा 50 टक्केही देऊ शकता, तर यापेक्षा चांगले काहीही नाही. कारण त्याच्या नावासोबत सचिन जोडला गेला आहे, त्यामुळे अर्जुनकडून खूप अपेक्षा आहेत.''
या मोसमात मुंबई इंडियन्सने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत यावेळी अर्जुन तेंडुलकरही पदार्पण करेल, अशी आशा होती, मात्र तसे होऊ शकले नाही. अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन सत्रांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे आणि तो त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहे.