वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत जेव्हा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो तेव्हा अनेकदा खेळाडू अनुभवी खेळाडूंकडे कशाप्रकारे दबाव हाताळायचा यासंबंधी सल्ला मागतात. भारतीय संघाने सेमी-फायनल सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला सल्ल्याची गरज असेल तर भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव हे अतिशय योग्य व्यक्ती आहेत. एकेकाळचे अष्टपैलू खेळाडू कपिल देव हे खासकरुन जलदगती गोलंदाजांना मोलाचा सल्ला देऊ शकतात. पण कपिल देव यांनी यांनी स्वत:ला सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपपासून दूर ठेवणं पसंत केलं आहे. सध्याच्या एकाही भारतीय खेळाडूने आपल्याकडे सल्ला मागितला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TRS Clips शी संवाद साधताना कपिल देव यांना विचारण्यात आलं की, सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला खेळताना पाहून तुमच्या जुन्या आठवणी जागा होत्यात का? त्यावर कपिल देव यांनी आपल्याला त्यांच्या भूमिकेत जाण्याची इच्छा नाही. तसंच त्यांना नेमकं कशा पद्धतीने खेळावं याबाबत सल्ला देणार नाही हे मान्य केलं. यावेळी 64 वर्षीय कपिल देव यांनी सध्याच्या क्रिकेट संघातील कोणत्याही खेळाडूने आपल्याकडे मदत किंवा सल्ला मागितला नसल्याची माहिती दिली. 


"मला सध्याच्या भारतीय क्रिकेटर्सच्या भूमिकेत जाण्याची इच्छा नाही. तुम्ही हे करा किंवा अशा पद्धतीने खेळा हे माझी सांगण्याची इच्छा नाही. मला त्यांच्यापासून स्वत:ला वेगळं ठेवायचं आहे आणि त्यांना खेळताना पाहायचा आहे," असं कपिल देव म्हणाले आहेत.


"नाही, सध्याचे खेळाडू मदत मागत नाहीत. ज्यांना माझ्याकडे यायचं आहे किंवा यायचं नाही त्यांना मी जबरदस्ती करु शकत नाही. त्यांना तसं करण्याचं बंधन नाही. ही मुलं फार हुशार असून, त्यांना आमच्यासारख्या लोकांची गरज नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले नाही. आम्ही फक्त त्यांना अजून चांगलं होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो," असं कपिल देव यांनी सांगितलं. 


कपिल देव यांनी यावेळी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "मला वाटतं मोहम्मद शमी हा विलक्षण आहे. बुमराहला तर सलाम आहे. इतका छोटा रन-अप आणि वेगळ्या अॅक्शनसह एखादा गोलंदाज इतका धोकादायक असू शकतो याची मी कल्पनाही करु शकत नाही," असं कपिल देव म्हणाले आहेत. 


तुम्ही मोहम्मद शमी आणि बुमराह यांना काय सल्ला द्याल असं विचारण्यात आलं असता कपिल देव यांनी उत्तर दिलं की,  ते अनुभवी आहेत. त्यांनी फक्त स्वत:ला फिट ठेवण्याची गरज आहे.