बंगळुरू : कोरोना व्हायरसचा फटका आता भारतातही बसायला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५०च्या वर रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या या धोक्यामुळे आता आयपीएलही संकटात सापडलं आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द करावं किंवा पुढे ढकलावं, अशी मागणी कर्नाटक सरकारने केली आहे. याबाबतचं पत्र कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला लिहिलं आहे. कर्नाटकमधलं स्थानिक न्यूज चॅनल दिग्विजय २४/७ ने हे वृत्त दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक सरकारने आयपीएलचं आयोजन करण्यात असमर्थता दर्शवल्यामुळे आता स्पर्धेच्या भविष्यावरच टांगती तलवार आहे. ९ मार्चला बंगळुरूमधल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी दिली आहे.


राजीव गांधी इनस्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसिज या बंगळुरूच्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या प्राथमिक शाळा आणि आयटी कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.


दुसरीकडे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही आयपीएल पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली आहे. जिकडे मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा होतात, तिकडे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा स्पर्धाचं आयोजन पुढे ढकललं जाऊ शकतं, असं राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.


विराट कोहलीच्या आरसीबीचं बंगळुरूमधलं चिन्नास्वामी स्टेडियम हे होम ग्राऊण्ड आहे. बीसीसीआयने मात्र आयपीएलच्या आयोजनावर कोरोना व्हायरसचा परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी काळजीचे सगळे उपाय केले जातील. आयपीएलला अजून बराच वेळ आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.


आयपीएलच्या या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ही ओपनिंग मॅच रंगेल.