मुंबई : IPL 2022 म्हणजे क्रिकेटचं महाकुंभ सुरु झालं आणि पाहता पाहता क्रिकेवेड्या रसिकांनी या स्पर्धेतून त्यांच्या आवडीच्या खेळाडूंना उचलून धरलं. अशी नावं समोर आली ज्यांना या स्पर्धेच्या आधी फार कमी किंवा अगदी कोणीच ओळखतही नव्हतं. पण, क्रिकेटनंच त्यांना प्रसिद्धीझोतात आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या निमित्तानं असेच काही चेहरे समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीची असंच एक मराठमोळं नाव प्रसिद्धीझोतात आलं आणि सगळेच त्याच्या खेळानं थक्क झाले.


कारण ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात, त्याच वयात या खेळाडूनं किमया करत आपल्या खेळाच्या बळावर परिस्थितीच्या नाकावर टिचून आयपीएलमध्ये आपलं स्थान मिळवलं. हा खेळाडू होता प्रवीण तांबे.


प्रवीण तांबे आहे तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे, ‘कौन प्रवीण तांबे?’


प्रवीण तांबे होता तरी कोण, त्याची आयपीएलमध्ये एंट्री कशी झाली, खेळानं त्याला यश देण्याआधी कशा पद्धतीनं खस्ताही खायला लावल्या हे या चित्रपटातून साकारलण्यात आलं. या चित्रपटाची खास स्क्रीनिंग नुकतीच कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ठेवण्यात आली होती.


यावेळी खुद्द प्रवीण तांबेसुद्धा तिथं हजर होता. आपल्या आयुष्याला असं मोठ्या पडद्यावर साकारलं गेल्याचं पाहिल्यानंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला.


आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणून तो उभा राहिला आणि त्यानंतर, मी इतकंच म्हणू इच्छितो की..... इतक्यातच त्याला हुंदका दाटून आला आणि पुढे शब्दही सुचेनासे झाले.


प्रवीणनं अखेर भावना आवरत, स्वप्न पाहणं कधी सोडू नका...  कारण स्वप्न सत्यात उतरतात. खरंच... सत्यात उतरतात इतकंच तो म्हणू शकला.


यावेळी काही खेळाडूंनी पुढे येत प्रवीणला आधारही दिला. आपला संघर्ष अखेर फळास आल्याचं पाहून हे सर्व क्षण खुद्द प्रवीणसाठीही एखाद्या स्वप्नाहून कमी नाहीत.


तांबेनं राजस्थान रॉयल्स संघातून 2013 मध्ये आयपीएलमधून पदार्पण केलं. यावेळी त्याचं वय 41 वर्षे इतकं होतं. याआधी त्यानं कधीच प्रोफेशनल क्रिकेट खेळलं नव्हतं. त्या क्षणी IPL मध्ये पदार्पण करणाऱ्यांपैकी तो सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला.



2014 मध्ये त्यानं कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी हॅटट्रीकही घेतली होती. मध्यमगती फिरकी गोलंदाज अशी त्याची ओळख आता साऱ्या जगानं पाहिली होती. 2020 मध्येही प्रवीण तांबेला कोलकाता संघानं खरेदी केलं.


पण, बीसीसीआयनं त्याचा करार रद्द केला. बोर्डाच्या परवानगीशिवाय त्यानं टी 10 लीगमध्ये सहभाग घेतला होता. तो कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्ससाठी खेळायला गेला होता, ज्यामुळं ही कारवाई करण्यात आली होती.