पालेकेले : वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डच्या नावावर नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. ५०० टी-२० मॅच खेळणारा पोलार्ड हा जगातला पहिलाच खेळाडू बनला आहे. बुधवारी श्रीलंकेविरुद्धच्या मॅचवेळी पोलार्डने हा विक्रम केला. या यादीमध्ये पोलार्डनंतर दुसरा आणि तिसरा क्रमांकही वेस्ट इंडिजच्याच खेळाडूचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलार्डने ५०० टी-२० मॅचमध्ये १०,००० रन केले आहेत. पोलार्डच्या नावावर २७९ विकेटही आहेत. एवढच नाही तर त्याने ६५२ सिक्स आणि ६४७ फोरही मारले आहेत. मागच्याच वर्षी पोलार्डला वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं.


कायरन पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसोबतच वेगवेगळ्या देशांच्या टी-२० लीगमध्येही खेळतो. आयपीएलमध्ये पोलार्ड गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईच्या टीमचा भाग आहे. पोलार्ड हा मुंबई टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मुंबईच्या टीमने सर्वाधिक ४ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. या सगळ्या मोसमात पोलार्ड मुंबईकडून खेळला. येत्या २९ तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पहिलीच मॅच गतिविजेती मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे.


पोलार्डनंतर वेस्ट इंडिजच्याच ड्वॅन ब्राव्होने ४५३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. ब्राव्होने या मॅचमध्ये ४९६ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर ब्राव्होने २० अर्धशतकांसह ६,३०७ रनही केले आहेत.


वेस्ट इंडिजच्याच क्रिस गेलने ४०४ टी-२० मॅचमध्ये १३,२९६ रन केले. यामध्ये तब्बल २२ शतकं आणि ८२ अर्धशतकांचा समावेश आहे. गेलच्या नावावर ८० टी-२० विकेटही आहेत. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये ९७८ सिक्स लगावले आहेत. 


श्रीलंकेविरुद्धची मॅच सुरु होण्याआधी वेस्ट इंडिज टीममधल्या खेळाडूंनी पोलार्डला एक खास जर्सी भेट म्हणून दिली. या जर्सीवर पोलार्डचं नाव आणि ५०० क्रमांक लिहिला होता.