कारणं अनेक पराभव एक; K.L.Rahul कडून इतर कर्णधारांनी काय शिकावं?
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने टीमच्या पराभवावर प्रतिक्रिया दिलीये. यावेळी त्याने पराभवाचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवीन टीम्सचा सामवेश झाला आहे. यावेळी गुजरात टायटन्सने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय नोंदवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. गुजरात टीमने 5 विकेट्स राखून लखनऊ सुपर जाएंट्सवर विजय मिळवला. यानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने टीमच्या पराभवावर प्रतिक्रिया दिलीये. यावेळी त्याने पराभवाचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.
कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, हा एक अभूतपूर्व गेम होता. मात्र फलंदाजीला अशी सुरुवात करणं योग्य नव्हते. मात्र फलंदाजीमध्ये खालील क्रमांकावर आम्ही चांगलं काम केलं. जेव्हा मध्यम आणि खालच्या फळीतील फलंदाज हे काम करू शकतात, तेव्हा आम्हाला आत्मविश्वास मिळतो.
केएल राहुल पुढे म्हणाला की, या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. शमीच्या गोलंदाजी सर्वांना माहीत आहे. तो धोकादायक ठरू शकतो हे मला माहीत होतं. त्याला इतकी चांगली गोलंदाजी करताना पाहून मला आनंद झाला. दरम्यान मैदानावर दव असल्याने बॉल पकडणं कठीण होतं, पण मी पराभवाचं कारण यावर फोडू शकत नाही.
सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. गुजरात टायटन्सकडून राहुल तेवातियाने 24 बॉल्समध्ये 40 रन्स केले. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. 159 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 19.4 ओव्हरमध्ये राहुल तेवातियाने टीमला विजय मिळवून दिला.