हार्दिक राहुलचं टेन्शन वाढलं, टांगती तलवार अजूनही कायम
हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती.
नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यानंतर पांड्या आणि राहुल या दोघांवर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती. पण लोकपाल नियुक्त न झाल्यामुळे प्रशासकीय समितीने या दोघांवरचं निलंबन हटवलं होतं. पण आता पुन्हा एकदा या दोन्ही खेळाडूंची चिंता वाढू शकते.
बीसीसीआय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं हे प्रकरण लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे सोपवायला तयार आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीत अधिकृतरित्या हा मुद्दा लोकपालकडे दिला जाईल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
२१ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए.बोबडे आणि ए.एम.सप्रे यांच्या खंडपीठाने सेवानिवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांना बीसीसीआयचे लोकपाल म्हणून नियुक्ती केली. तत्काळ कार्यकाळ सांभाळण्यासाठी न्यायालयाने जैन यांना सांगितलं. यानंतर आता राहुल आणि हार्दिकचं प्रकरण जैन यांच्याकडे देण्यात येईल. यानंतर जैन हे राहुल आणि पांड्या प्रकरणाची चौकशी करुन निर्णय घेतील. त्यामुळे आता जैन यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.