चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका केली होती. 'विराट कोहली हा चतूर कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना धोनी किंवा रोहित शर्माशी होऊ शकत नाही. कोहलीने बंगळुरू टीम प्रशासनला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तो अजूनही बंगळुरूच्या टीमसोबत आहे. स्पर्धा न जिंकणाऱ्या कर्णधारांना एवढा वेळ दिला जात नाही', असं गंभीर म्हणाला होता. गौतम गंभीरच्या या टीकेला आता विराट कोहलीने प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाहेर बसलेली लोकं काय म्हणत आहेत याचा विचार करत बसलो असतो, तर मला घरीच बसावं लागलं असतं, असं उत्तर विराटने दिलं. 'निश्चितच तुम्ही आयपीएल जिंकायचा प्रयत्न करता. माझ्याकडून ज्याची अपेक्षा आहे तेच मी करतो. आयपीएल जिंकल्याबद्दल किंवा न जिंकल्याबद्दल होणाऱ्या टीकेची मी पर्वा करत नाही. आपलं सर्वश्रेष्ठ देण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याचा मी प्रयत्न करतो, पण प्रत्येकवेळी असं होत नाही,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'आम्हाला आयपीएल का जिंकता आली नाही याचा आम्हाला व्यावहारिक विचार करायला हवा. दबावात असताना खराब निर्णय घेतल्यामुळे असं झालं. जर मी बाहेर बसलेल्यांसारखा विचार करायला लागलो, तर मी पाच मॅचही खेळू शकलो नसतो आणि घरी बसलो असतो,' असं टोला विराटने गंभीरला हाणला.


काय म्हणाला होता गंभीर?


'आयपीएलमध्ये धोनी आणि रोहितने तीनवेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे विराटला अजून मोठं अंतर कापायचं आहे. याबाबतीत तुम्ही विराटची तुलना रोहित किंवा धोनीशी करु शकत नाही,' असं वक्तव्य गंभीरने केलं.


धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आणि रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आत्तापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएल जिंकलं आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूला एकदाही आयपीएल जिंकता आलं नाही. गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वात कोलकाताला २०१२ आणि २०१४ साली आयपीएलमध्ये विजय मिळवून दिला होता.