नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१७ रनवर ऑल आऊट झाला यामुळे भारतानं ही मॅच तब्बल २०३ रननी जिंकली. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये ९७ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रनची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं ६ ओव्हरमध्येच इंग्लंडच्या ५ विकेट घेत भारताला पहिल्या इनिंगमध्ये १६८ रनची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आल्यावर परत पांड्यानं ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रनची खेळी केली. ५२१ रनचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला जसप्रीत बुमराहनं ५ धक्के दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या इनिंगमध्ये ९७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रन करणाऱ्या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. इंग्लंडविरुद्धच्या या विजयाबरोबरच विराट कोहलीनं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलेल्या ३८ टेस्ट मॅचपैकी भारतानं २२ मॅच जिंकल्या आहेत. सौरव गांगुलीनं ४९ टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यापैकी २१ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. मोहम्मद अजहरुद्दीननं ४७ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं यातल्या १४ मॅच भारतानं जिंकल्या. सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीमध्ये आता विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीनं ६० टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यातल्या २७ टेस्टमध्ये भारताचा विजय झाला.


३८ टेस्टनंतर सर्वाधिक विजय


३० रिकी पाँटिंग


२७ स्टिव्ह वॉ


२२ मायकल वॉन, विराट कोहली


२१ व्हिव रिचर्ड्स, मार्क टेलर


२० अॅन्ड्र्यू स्ट्राऊस


विराटची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी


टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २३वं शतक आहे.  या शतकाबरोबरच विराटनं विरेंद्र सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं लगावणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.


विराट कोहलीनं ११८ इनिंगमध्ये २३ शतकं केली आहेत. तर सेहवागला एवढीच शतकं करायला १७८ इनिंग लागल्या. सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. सचिननं ३२९ इनिंगमध्ये ५१ शतकं केली. तर राहुल द्रविड या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडनं २८४ इनिंगमध्ये ३६ शतकं केली. सुनिल गावसकर २१४ इनिंग आणि ३४ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.