कुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आम्ही कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला घेऊन मैदानात उतरू शकतो, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं आहे. गेल्या काही सीरिजमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची कामगिरी शानदार झाली आहे. कुलदीप यादव याआधी २ टेस्ट मॅच खेळला आहे. पण चहलला मात्र अजूनही टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडेमध्ये कुलदीप यादवच्या बॉलिंगसमोर इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. त्यामुळे कुलदीपला टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळू शकते. टेस्ट टीमची निवड करताना काहीही शक्य आहे. काही आश्चर्यकारक निवडही होऊ शकते, असं विराट म्हणाला.
अश्विन-जडेजाचं स्थान संकटात
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलबद्दल धोनीनं केलेल्या वक्तव्यामुळे आता अश्विन आणि रवींद्र जडेजाचं स्थान संकटात आलं आहे. यादव आणि चहलमुळे अश्विन-जडेजा वनडे आणि टी-२० टीममधून आधीच बाहेर झाले आहेत. आणि आता कुलदीप आणि चहल टेस्ट टीममध्येही आले तर अश्विन-जडेजा यांना कमबॅक करणं आणखी कठीण जाईल.