कोहलीने टीममधून बाहेरचा रस्ता दाखवलेला खेळाडू रोहितसाठी ठरतोय मॅचविनर
रोहित शर्माने एका खेळाडूबद्दल सांगितलं ज्याला तो संघाचं सर्वात मोठं शस्त्र मानतो.
मुंबई : भारतीय T-20 क्रिकेट टीमचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्माने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करून आपल्या कार्यकाळाची शानदार सुरुवात केली. रोहित कर्णधार बनताच अनेक युवा खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडूही संघात परतले. दरम्यान, रोहित शर्माने एका खेळाडूबद्दल सांगितलं ज्याला तो संघाचं सर्वात मोठं शस्त्र मानतो.
रोहित शर्माचं सर्वात मोठं शस्त्र आहे हा गोलंदाज
भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाला मधल्या ओव्हरमध्ये विकेट्सची गरज असते. तेव्हा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन नेहमीच आक्रमक पर्याय असतो.
T20 मध्ये, कर्णधार रोहितने न्यूझीलंडविरुद्ध 3-0 च्या विजयात संघाची गोलंदाजी ही सर्वात मोठी सकारात्मक बाजू असल्याचं म्हटलं. या महिन्याच्या सुरुवातीला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत चार वर्षांनी टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या 35 वर्षीय अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत मधल्या ओव्हरमध्ये धावा रोखून दमदार कामगिरी केली.
अश्विनचे खूप कौतुक
तिसऱ्या T20 सामन्यात 73 धावांनी विजय मिळविल्यानंतर रोहित म्हणाला, “तो कोणत्याही कर्णधारासाठी नेहमीच आक्रमक पर्याय असतो. जेव्हा तुमच्या संघात त्याच्यासारखा गोलंदाज असतो. तेव्हा तुम्हाला मधल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याची संधी मिळते. तो एक महान गोलंदाज आहे आणि हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे."
रोहित खेळाडूंना संधी देतोय
रोहित म्हणाला, "आमच्या पहिल्या भेटीत आम्ही प्रत्येक खेळाडूला स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर तुम्ही संघासाठी काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष केलं जाणार नाही, हे कर्णधार आणि प्रशिक्षकाचं काम आहे."