कर्णधारपद सोडण्याच्या कोहलीच्या निर्णयाचा सौरव गांगुलीलाही बसला होता धक्का!
टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबई : टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचा अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी सौरव गांगुलीही पूर्णपणे आश्चर्यचकित झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. कारण असे बरेच दिवस याबाबत काही बोलणं झालं नव्हतं. इंग्लंड दौऱ्यानंतरच त्याने हा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता.
सौरव गांगुली पुढे म्हणाले, "कोहलीवर आमच्या बाजूने कोणताही दबाव नव्हता. कॅप्टन्सी सोडण्याची पूर्णपणे त्याची निवड होती. आजच्या काळात खेळाडू वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांच्यावर दडपण असतं. भारतीय संघाच्या कर्णधारपदावरही वेगळं दडपण असते, त्यामुळे ते सोपं नसतं."
कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबाबत सौरव गांगुली म्हणाले, "तोही एक माणूस आहे, मशीन नाही. विराट प्रत्येक वेळी शतक झळकावणार नाही. प्रत्येक वेळी फॉर्म कोणालाही साथ देत नाही. पण जर इतकी प्रदीर्घ कारकीर्द असेल, आलेख वर गेला असेल तर तो खाली येईल पण पुन्हा वरही जाईल."
कर्णधार विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या शतकाची वाट पाहतोय. विराट कोहलीची चांगली सुरुवात होत आहे, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही. विराट कोहलीने टी -20 विश्वचषकापूर्वी घोषणा केली होती की, या स्पर्धेनंतर तो टी -20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार आहे.