कोलकात्यानं पंजाबला धुतलं! यंदाच्या आयपीएलमधला सर्वाधिक स्कोअर
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं रनचा डोंगर उभारला आहे.
इंदूर : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं रनचा डोंगर उभारला आहे. या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला पण ही खेळी पंजाबच्या चांगलीच अंगाशी आली आहे. कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २४५ रन केल्या आहेत. ओपनिंगला आलेल्या सुनिल नारायणनं ३६ बॉलमध्ये ७५ रनची वादळी खेळी केली. नारायणच्या इनिंगमध्ये ९ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. तर कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकनं २३ बॉलमध्ये ५० रन केले. दिनेश कार्तिकनं ५ फोर आणि ३ सिक्स लगावले. पंजाबकडून अॅण्ड्रयू टायनं ४ ओव्हरमध्ये ४१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर बरिंदर श्रन आणि मोहित शर्माला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम पाचव्या क्रमांकावर तर पंजाबची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकात्यानं ही मॅच जिंकली तर ते चौथ्या क्रमांकावर जातील आणि मुंबईची टीम पुन्हा पाचव्या क्रमांकावर येईल. ११ मॅचमध्ये ५ मॅच जिंकून कोलकात्याकडे १० पॉईंट्स आहेत. तर मुंबईनंही ११ मॅचमध्ये ५ मॅच जिंकल्या आहेत. कोलकात्यानं ही मॅच जिंकली तर त्यांचे १२ मॅचमध्ये ६ मॅच जिंकल्यामुळे १२ पॉईंट्स होतील.