मुंबई : २०२० या वर्षात टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा खेळवली जाईल. टी-२० वर्ल्ड कप जवळ असल्यामुळे टीम इंडियाही या वर्षात जास्त टी-२० मॅच खेळणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण खेळणार? यासाठी शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यात स्पर्धा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी निवड समिती अध्यक्ष कृष्णमच्चारी श्रीकांत यांनी याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मासोबत केएल राहुलची निवड करेन. शिखर धवनला निवडणार नाही, असं श्रीकांत म्हणाले.


श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये रन बनवणं जास्त महत्त्वाचं नाही. याची गणतीही होणार नाही. जर मी निवड समिती अध्यक्ष असतो तर शिखर धवनला टीममध्ये घेतलं नसतं. धवन आणि राहुलमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. फक्त एकच विजेता आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांतने दिली.


श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून दुखापत झालेला शिखर धवन टीममध्ये पुनरागमन करत आहे. २०२० साली नवी सुरुवात करायची आहे. मला भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचा आहे. मागच्या वर्षी दुखापतीमुळे मला बराच त्रास झाला, पण दुखापत हा खेळाचा हिस्सा आहे. हे नवीन वर्ष आहे. मी पूर्ण सकारात्मकता घेऊन मैदानात उतरणार आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करणार आहे. ही सीरिज माझ्यासाठी चांगली संधी आहे, असं शिखर धवनने सांगितलं.


शिखर धवनला दुखापतीआधीही टी-२० क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. धवनने मागच्या १२ टी-२० इनिंगमध्ये ११०.५६ च्या स्ट्राईक रेटने फक्त २७२ रन केले आहेत. दुसरीकडे केएल राहुलने ९ इनिंगमध्ये १४२.४० च्या स्ट्राईक रेटने ३५६ रन केले. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्येही राहुलने चांगली कामगिरी केली होती.