सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला. या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १६४ रन केले. पण पहिल्या टी-२०मध्ये खलनायक ठरलेला कृणाल पांड्या या मॅचमध्ये भारतासाठी नायक ठरला. तिसऱ्या मॅचमध्ये कृणाल पांड्यानं ४ ओव्हरमध्ये ३६ रन देऊन ४ विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या मॅचमध्ये कृणाल पांड्या आणि खलील अहमदनं आपल्या एक-एक ओव्हरला प्रत्येकी तीन-तीन सिक्स मारले. त्या मॅचमध्ये क्रिस लिन आणि ग्लेन मॅक्सवेलनं प्रत्येकी चार-चार सिक्स आणि स्टॉयनिसनं एक सिक्स मारली. पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं भारतीय बॉलरना ९ सिक्स आणि ८ फोर मारले. यामुळे ऑस्ट्रेलियानं १६ ओव्हरमध्येच १५० रन केले होते. पण पहिल्या टी-२०मधल्या कामगिरीचा हिशोब कृणाल पांड्यानं तिसऱ्या टी-२० मध्ये चुकता केला.


तिसऱ्या टी-२०मध्ये ओपनर डी आर्सी शॉर्ट(३३ रन) आणि एरॉन फिंच(२८ रन) यांनी ६८ रनची पार्टनरशीप केली. पण फिंचची विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाला वारंवार धक्के लागायला सुरुवात झाली. कुलदीप यादवनं फिंचची विकेट घेतली. त्याआधी रोहित शर्मानं कृणाल पांड्याच्या बॉलिंगवर फिंचचा कॅच सोडला होता. यानंतर कृणाल पांड्यानं मैदानामध्येच त्याची निराशा जाहीर केली. पण नंतर लगेचच कृणाल पांड्यानं ऑस्ट्रेलियाला झटके द्यायला सुरुवात केली.



ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १०० रनवर असताना पांड्यानं डी आर्सी शॉर्ट(३३रन), बेन मॅकडरमट(०रन) आणि ग्लेन मॅक्सवेलला(१३रन) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर एलेक्स कारे(२७रन) आणि क्रिस लिन(१३रन) यांनी पाचव्या विकेटसाठी २९ रनची पार्टनरशीप केली. पण कृणाल पांड्यानं एलेक्स कारेला विराट कोहलीच्या हातून कॅच आऊट केलं.



कृणालचं रेकॉर्ड


ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये ४ विकेट घेणारा कृणाल पांड्या हा पहिला स्पिनर ठरला आहे. कोणत्याही स्पिन बॉलरचं ऑस्ट्रेलियातलं हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियात एका मॅचमध्ये ३ विकेट घेतले होते.