`कोविंद यांच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करा`
नितीश कुमारांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा
नवी दिल्ली : नितीश कुमारांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा, असं आवाहन राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी केलंय. UPAनं मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर लालूंनी बिहारमधल्या आपल्या मित्रपक्षाला पाठिंब्यासाठी साद घातलीये.
आपण स्वतः नितीश कुमारांना भेटून याबाबत गळ घालणार असल्याचं लालू म्हणालेत. अर्थात, लालूंच्या या आवाहनानंतरही संयुक्त जनता दलाचा निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं दिसतंय. कोविंद यांना दिलेला पाठिंबा योग्यतेच्या आधारे दिल्याचं पक्षाचे प्रवक्ते के.सी त्यांगी यांनी स्पष्ट केलंय.
यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसकडून सोनिया गांधी, मनमोहन सिंह, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, एके एंटनी, मल्लिकार्जुन खडगे, बीएसपीमधून सतीश मिश्रा, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन, केरल काँग्रेसचे जॉर्ज मनी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, आरएलडीचे अजीत सिंह, नॅशनल कॉन्फ़्रेंसचे उमर अब्दुल्ला, एनसीपीचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तारिक अनवर, सीपीएमचे सीताराम येच्यूरी, सीपीआयचे डी राजा, आरएसपीचे प्रेमचंद्रन, डीएमकेचे कनिमोझी, जेएमएमचे हेमंत सोरेन, जेडीएसचे दानिश अली खान, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट प्रतिनिधी, मुस्लिम लीगचे कुंजली कुट्टी, आरजेडीचे लालू यादव आणि जयप्रकाश नारायण यादव या बैठकीत सहभागी झाले होते. बुधवारी काँग्रेस नेता मीरा कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.