लसित मलिंगा १० वर्षापासून आईवडीलांकडे गेला नाही....
यॉर्करकिंग लसिथ मलिंगा आपल्या वनडे कारकिर्दीतील अखेरची मॅच बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. या मॅचनंतर तो निवृत्त होणार आहे. निवृत्तीची घोषणा मलिंगाने काही दिवसांपूर्वीच केली होती.
कोलंबो : यॉर्करकिंग लसिथ मलिंगा आपल्या वनडे कारकिर्दीतील अखेरची मॅच बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. या मॅचनंतर तो निवृत्त होणार आहे. निवृत्तीची घोषणा मलिंगाने काही दिवसांपूर्वीच केली होती. क्रिकेट विश्वात आपल्या भेदक बॉलिंगने आणि हटके एक्शनने त्याने वर्चस्व निर्माण केले आहे.
पण यशाच्या शिखरावर असणाऱ्या मलिंगाला आई-वडीलांना भेटायला तेवढा वेळ नाही, लसितच्या मुळगावी त्याचे आईवडील राहतात. त्यांना जेव्हा त्याची आठवण येते, तेव्हा तेच कोलंबोला येऊन त्याला भेटतात. मलिंगा गेल्या १० वर्षांपासून आपल्या घरी, म्हणजेच मूळगावी गेलेला नाही.
इंडियन एक्सप्रेसनुसार श्रीलंकेतील गाले शहरातील रथगामामधील एका लहानशा गावात मलिंगाचे घर आहे. क्रिकेटपटूचे घर म्हणजे भव्य दिव्य. पण याला मलिंगाचे मूळघर म्हणजेच गावचं वडलोपार्जित घर अपवाद आहे. मलिंगाचे ते घर साधंसुधं आहे.
मलिंगाच्या गावातील घराचा दरवाजा उघडल्यानंतर चर्रर्र असा आवाज येतो. दररोज शिवणकाम करणं, हे मलिंगाच्या आईचा दिनक्रम. मलिंगाची आई पॉलिस्टरचे कपडे शिवते. मलिंगाचे आई-वडिल हे स्वत:च स्वत:चे कपडे शिवतात.
मलिंगाची आई बँकेतून निवृत्त झाली आहे, पण तिला शिलाई काम आवडतं, म्हणून ती वेळ घालवण्यासाठी शिलाई काम करते. मलिंगाचे आईवडील साधं जीवन जगतात, मात्र त्यांच्यात आणि मलिंगात मतभेद नाहीत.
घराच्या एका कोपऱ्यात लसिथ मलिंगाची फोटो फ्रेम आहे. यामध्ये फोटोत मलिंगाने क्रिकेटकिट घातले आहे. या फोटोफ्रेम मागील एक किस्सा मलिंगाच्या आईने सांगितला.
'लसिथ एकदा क्रिकेटनिमित्ताने एका दौऱ्यावर गेला होता. त्यादरम्यान मला त्याची फार आठवण आली. घराच्या प्रत्येक ठिकाणी लसिथचा फोटो शोधला पण मिळाला नाही. त्यानंतर एका पेपरमध्ये मलिंगाचा फोटो आला होता. तो फोटो कापून मी घराच्या कोपऱ्यात लावला', असे मलिंगाची आई म्हणाली,
'मी त्याला ४ महिन्यांपासून पाहिलं नसल्याचे त्याची आई म्हणाली. पण मला आता या सर्व प्रकाराची सवय झाली आहे. लसिथ आपल्या मूळगावी दहा वर्षांपासून आलेला नाही.
बहुतेक तो तिथेच आनंदी असेल. त्याला कोलंबोमधील जीवनशैली अधिक चांगली वाटत असेल. तो आनंदी असेल, तर आम्ही देखील आनंदी आहोत.
मी एकदा कोलंबोला गेली होती. जिथे माझा सर्वात लहान मुलगा राहतो. पण आम्ही इथेच गावात रमतो. कोलंबोतील रोजची दगदग आम्हाला आवडत नसल्याचे मलिंगाची आई म्हणाली.