मुंबई : श्रीलंकेचा कॅप्टन आणि आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा वेगवान बॉलर लसिथ मलिंगाने एक अनोखी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा मलिंगा हा बहुतेक पहिलाच खेळाडू असण्याची शक्यता आहे. मलिंगाने 12 तासांच्या कालावधीत 2 मॅच खेळण्याचा भीम पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे 2 मॅचपैकी एक मॅच ही भारतात होती तर एक श्रीलंकेत. त्यातही एक मॅच ही 20 तर दुसरी मॅच ही 50 ओव्हरची होती. चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात बुधवारी 3 एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा 37 रन्सने विजय झाला. ही मॅच संपवून मलिंगा तडक श्रीलंकेत मॅच खेळण्यासाठी निघाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


श्रीलंकेत 4 एप्रिलपासून 'सुपर प्रोव्हेंशियल वनडे टुर्नामेंट' स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चेन्नई विरुद्धातील मॅच आटोपल्यानंतर मलिंगा श्रीलंकेला रवाना झाला. आगामी वर्ल्डकप स्पर्धेत पात्र होण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळणं बंधनकारक करण्यात आलं होतं. असे आदेशच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिले होते.


चेन्नई विरोधातील मॅच निकालात निघण्यासाठी रात्रीचे 12 वाजले होते. यानंतर मलिंगाने भारत-श्रीलंका प्रवास पू्र्ण करुन दुसऱ्या दिवशी सकाळी मॅच खेळण्यासाठी 10 दरम्यान मैदानात दाखल झाला. 4 एप्रिलला श्रीलंकेमध्ये कॅंडी विरुद्ध गाले या टीममध्ये ही मॅच झाली. मलिंगा गाले टीमकडून खेळत असून तो नेतृत्वदेखील करत आहे. मलिंगाने केवळ 12 तासाच्या कालावधीत 2 मॅच खेळला. इतकेच नसून त्याने या दोन्ही मॅचमध्ये आपल्या कामगिरीने टीमच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली. मुंबईकडून चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना मलिंगाने 4 ओव्हरमध्ये 34 रनच्या मोबदल्यात 3 विकेट मिळवल्या. 


गाले टीमकडून खेळताना मलिंगाने कॅप्टन आणि बॉलर अशी दुहेरी भूमिका यशस्वीरित्या निभावली. मलिंगाने  तब्बल 7 विकेट घेतल्या. यात त्याने 9.5 ओव्हरमध्ये केवळ 49 रन दिल्या. मलिंगाच्या या किफायतशीर बॉलिंगमुळे गालेची दणक्यात सुरुवात झाली. गालेने ही वनडे मॅच 156 रनने जिंकली