`मागचे ७ महिने आयुष्यातले सगळ्यात कठीण`
हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयपीएलमध्ये मुंबईने चेन्नईचा ३७ रननी दणदणीत पराभव केला.
मुंबई : हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयपीएलमध्ये मुंबईने चेन्नईचा ३७ रननी दणदणीत पराभव केला. हार्दिक पांड्याने ८ बॉलमध्ये नाबाद २५ रनची खेळी केली. तर बॉलिंग करताना चेन्नईच्या सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मागचे ७ महिने हे आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली. कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. वाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून दोघांना मायदेशात परतावं लागलं होतं. अखेर बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यावेळी दोघांचं निलंबन मागे घेतलं.
मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर पांड्या म्हणाला, 'टीमला जिंकवून देण्यात योगदान दिल्यामुळे चांगलं वाटत आहे. मागच्या ७ महिन्यांमध्ये मी खूप कमी क्रिकेट खेळलो. हा काळ खूप कठीण होता. काय करायचं ते मला समजत नव्हतं. पण मी फक्त बॅटिंग करत होतो. मला माझा खेळ सुधरवायचा आहे.'
'पहिले दुखापतीमुळे आणि मग दुसऱ्या वादांमुळे मी टीमच्या बाहेर होतो. मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार मी माझं कुटुंब आणि मित्रांना समर्पित करतो. कारण ते कठीण प्रसंगामध्येही माझ्या मागे उभे राहिले. आता माझं लक्ष्य आयपीएल खेळणं आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवणं एवढच आहे', असं वक्तव्य हार्दिक पांड्याने केलं.