जेव्हा धनाढ्य BCCI होतं कंगाल, लतादीदींनी कशी केली मोठी मदत... गोष्ट थक्क करणारी
लता दीदींचं भारतीय क्रिकेटमधील योगदानंही वाखणण्याजोगं आहे. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी आर्थिक मदतीसाठी लता दीदी धावून आल्या होत्या.
मुंबई : आज सकाळी देशाच्या संपूर्ण जनतेला एक वाईट बातमी कळली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं सकाळी निधन झालं आहे. लता दीदींनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून सायंकाळी शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी सर्वजण लता दीदींच्या आठवणींना उजाळा देतायत.
यावेळी लता दीदींचं भारतीय क्रिकेटमधील योगदानंही वाखणण्याजोगं आहे. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा भारतीय बीसीसीआयकडे खेळाडूंना देण्यासाठी पैसे नव्हते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयची आर्थिक स्थिती त्यावेळी अत्यंत बिकट होती. तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना पुरस्कार देण्याची इच्छा होती, मात्र पैशांअभावी ते रखडलं होतं.
अशा कठीण परिस्थितीत साळवे यांनी लता मंगेशकर यांना संपर्क साधला आणि त्यांची मदत घेतली. टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये लांता मंगेशकर यांचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं.
त्या काळी लता मंगेशकर यांची ही मैफल प्रचंड गाजली. या कॉन्सर्टच्या माध्यमातून 20 लाख रुपये कमावले गेले. नंतर टीम इंडियातील सर्व सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली होती. पण 'भारत विश्व विजेता' या गाण्याला खूप लोकांची खूप पसंती मिळाली. या गाण्याचं संगीत लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. विशेष म्हणजे ज्यावेळी लता मंगेशकर स्टेजवर हे गाणं म्हणत होत्या त्याचवेळी तेव्हा टीम इंडियाचे खेळाडूही मागून लताजींच्या आवाजात सूर मिसळत होते.
या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी बीसीसीआयकडून कोणतीही फी घेतली नव्हती. लता मंगेशकर यांचं हे योगदान बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंच्या नेहमी लक्षात राहील. यावेळी बीसीसीआयने तर लता दीदींसाठी भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल, असा प्रस्ताव दिला.
लता मंगेशकर या 92 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.