सपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा `द वॉल`... हिरोंचा हिरो!
१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते `द वॉल` अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच `अनसंग हिरो`नं मोलाची भूमिका बजावली.
मुंबई : १९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.
राहुल द्रविड... अर्थातच भारतीय क्रिकेटची अभेद्य भिंत अशीच त्याची क्रिकेट जगतामध्ये खरी ओळख आहे. मात्र, क्रिकेटला अलविदा केल्यानंतर भारताच्या या लिजेंडरी क्रिकेटपटूनं भारताच्या युवा क्रिकेटपटूंना पैलू पाडण्याचा विडा यशस्वीपणे उचललाय.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या १९ वर्षाखालील संघानं भारताला चौथ्यांदा विश्व विजेतेपदाला गवसणी घातली. राहुल द्रविडनं ड्रेसिंग रुममध्ये आखलेली रणनीती पृथ्वी शॉच्या संघानं मैदानात प्रत्यक्ष उतरवली आणि जगज्जेतेपद पटकावलं.
हे अजिंक्यपद पटकावल्यानंतर राहुल द्रविडनं माझ्या प्रशिक्षणापेक्षा ८ जणांच्या सपोर्ट स्टाफाचा वाटा या विजयात मोठा असल्याची प्रतिक्रिया दिली. द्रविडनं भारताला विश्वविजेतेपद पटकावून दिलं तरी याचं श्रेय त्यानं न घेता सारं श्रेय त्यानं सपोर्ट स्टाफला दिला.
यावरुनच द्रविड किती महान असल्याचं दिसून येतं. डोकं शांत ठेवून जमिनीवर कसं राहता येतं हेच या क्रिकेटपटूंना शिकवलं. द्रविडची हीच शिकवणी या युवा संघासाठी फायदेशीर ठरली.
त्याचप्रमाणे या विश्वचषका दरम्यान एकीकडे भारताचा मुकाबला हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता... तर दुसरीकडे आयपीएलसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव होत होता. यावेळी द्रविडनं या क्रिकेटपटूंना विश्वचषकासारखी क्रिकेट स्पर्धा कारकीर्दीत एकदाच येते... आणि त्यामुळे या सामन्यावर पूर्ण लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.
या युवा क्रिकेटपटूंनी द्रविडचा सल्ला ऐकत उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. द्रविडबरोबर या क्रिकेटपटूंनी क्रिकेटचे धडे गिरवले आणि आज भारतीय संघ विश्वविजेता झाला... त्यामुळे भारताच्या या विजयाचा द्रविडच खरा हिरो आहे असं म्हटल तर वावग ठरणार नाही...