पॅरालम्पियन दीपा मलिक आता राजकारणाच्याही मैदानात
दीपा मलिक पहिली भारतीय महिला ऍथलीट आहे जिनं पॅरालम्पिक खेळांत पदक मिळवलंय
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. अशावेळी राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरू आहेत. देशात निवडणुकीचं वातावरण असताना राजकीय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात... मग यात मैदानावरचे खेळाडू तरी कसे मागे राहतील? क्रिकेटपटू गौतम गंभीरनंतर आता पॅरालम्पियन दीपा मलिकही राजकीय मैदानात दाखल झालीय. आत्तापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेली पॅरालम्पियन दीपा मलिक सोमवारी भाजपामध्ये दाखल झाली. ४८ वर्षीय दीपा मलिक दिव्यांग आहे. दीपानं २०१६ मध्ये रिओमध्ये पार पडलेल्या पॅरालम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर गंभीरही भाजपमध्ये दाखल झालाय.
दीपा मलिक भाजपचे हरियाणा विभाग प्रमुख सुभाष बराला आणि पक्षाचे प्रदेशातील प्रभारी - महासचिव अनिल जैन यांच्या उपस्थितीत पक्षात सहभागी झाली. दीपा मलिक यांच्या सहभागानं पक्ष आणखी मजबूत होईल, अशी आशा नेत्यांनी व्यक्त केलीय. दीपा मूळची हरियाणाची रहिवासी आहे. ती पहिली भारतीय महिला ऍथलीट आहे जिनं पॅरालम्पिक खेळांत पदक मिळवलंय.
दीपा संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरलीय. तिनं आपल्या देशाची गौरवानं मान उंचावलीय, अशी प्रतिक्रिया यावेळी अनिल जैन यांनी व्यक्त केली. हरियाणामध्ये भाजपानं अजूनही आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत. दीपाच्या नावाचा इथं नक्कीच विचार होऊ शकतो. दीपा मलिकसोबतच इंडियन नॅशनल लोकदलचे आमदार केहर सिंह रावत हेदेखील भाजपात दाखल झालेत.