लोकेश राहुलला दुखापत, टीम इंडियाला झटका लागण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे.
लोकेशला दुखापत
शिखर धवनच्या जागी दुसऱ्या कसोटीत समाविष्ट करण्यात आलेला लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याचे समजतेय. राहुलला सरावादरम्यान दुखापत झाल्याची माहिती आहे. सरावादरम्यान ईशांत शर्माच्या चेंडूवर राहुलच्या गुडघ्याला दुखापत झाली.
दुसऱ्या कसोटीत शिखर धवनच्या जागी लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, तो जर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला तर पुन्हा त्याचा टीम कॉम्बिनेशनवर परिणाम होईल.
मुरली विजयलाही अद्याप सूर गवसलेला नाही
तिसऱ्या कसोटीत सलामीची जोडी पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. दुसरा सलामीवीर मुरली विजयलाही सूर गवसलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. यातच राहुलची दुखापत विराटसाठी आणखी चितेंचा विषय ठरु शकतो.