नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं कोहली-धोनी-रोहितला आवाहन
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीची रविवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली.
नवी दिल्ली : २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीची रविवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीमध्ये भारतात ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होईल. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्माला आवाहन केलं आहे.
क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही नेहमीच उत्कृष्ट रेकॉर्ड करता. पण यावेळी १३० कोटी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करुन सर्वाधिक मतदानाचं रेकॉर्ड करण्यासाठी मदत करा. असं झालं तर लोकशाहीचा विजय होईल, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांना उद्देशूनही ट्विट केलं आहे.
याचबरोबर मोदी यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, करण जोहर, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, आलिया भट यांनाही असंच आवाहन केलं आहे.
कला आणि क्रीडा विश्वातल्या सेलिब्रिटींसोबतच मोदींनी राजकीय पक्षांमधील त्यांचे सहकारी आणि विरोधक यांना उद्देशूनही ट्विट केलं आहे. 'मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि रामविलास पासवान तुम्हाला आग्रह आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात वाढ होण्यासाठी तुम्ही योग्य ते सहकार्य कराल. आपल्याला देशात असं वातावरण तयार करावं लागणार आहे, ज्यामुळे मतदानाच्या टक्क्यात अधीक वाढ होईल.', असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले.
आणखी एका ट्विटमध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इत्यादींना लोकसभा निवडणुकीत मतदानचा टक्का वाढवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची विनंती केली.