RCB कडून पराभवानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया
आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊचा 14 धावांनी पराभव केला.
मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊचा 14 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर लखनऊचं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. लखनऊच्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशा झाली. ज्यावेळेपासून लखनऊ पराभवाच्या छायेत होता, तेव्हापासूनचं गौतम गंभीर खेळाडूंवर वैतागला होता. सामना संपल्यानंतर देखील तो खेळाडूंवर भडकताना कॅमेरात कैद झाला होता. आता पुन्हा एकदा गंभीरने पराभवावर मोठे विधान केले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा या मोसमातील हा पहिला सीझन होता, तरीही टीमने चांगली कामगिरी केली. जर आपण साखळी सामन्यांबद्दल बोललो, तर लखनौचा संघ गुणतालिकेत तिसर्या क्रमांकावर होता, त्याने 14 पैकी 9 सामने जिंकले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार केएल राहूलने 58 चेंडूत 79 धावा करत एक विशेष रेकॉर्ड आपल्या नावे केला. मात्र तरीही लखनऊ सामना जिंकू शकला नाही. लखनऊच्या पराभवानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
काय म्हणाला गौतम गंभीर ?
लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसह त्याने कॅप्शन लिहिले आहे, आज नशीब कठीण होते, पण आमच्या संघासाठी ही एक चांगली स्पर्धा होती. आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत आम्ही मजबूत परत येऊ, असे त्याने म्हटले आहे.
पहिला विशेष हंगाम संपला आहे. आम्हाला पाहिजे तसे यश हाती आले नाही, पण आम्ही शेवटपर्यंत आमचे सर्वोत्तम दिले. लखनौ सुपर जायंट्स परिवार, सपोर्ट स्टाफ, टीम मॅनेजमेंट आणि डॉ. संजीव गोयंका यांचेही आभार. आमच्या चाहत्यांचेही आभार ज्यांनी पहिल्याच सत्रात आमच्यावर खूप प्रेम केले, असे त्याने चाहत्यांचे आभार मानताना कर्णधार केएल राहुलने म्हटले.