ठाण्यात रंगणार `महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीग`
पहिला सामना ‘बाणेदार ठाणे’ विरुद्ध ‘मुंबईचे मावळे’ यांच्यात रंगणार आहे
ठाणे : लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीग' (MCCL) ठाण्यात लवकरच सुरुवात होतेय. आहे. नुकतेच नुतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे या स्पर्धेद्वारे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्यात रंगणार क्रिकेट सामने रंगणार आहेत. १ फेब्रुवारी सकाळी ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत १०० वादकांच्या ढोलताशाच्या गजरात स्टेडीयमचा उद्घाटन सोहळा पार पडेल.
महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे आयोजन ठाणे महानगरपालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर व संदीप जुवाटकर यांनी केले आहे. तसेच डी.बी. एन्टरटेनमेंटचे दिलीप भगत सह-आयोजक आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथजी शिंदे, महापौर मीनाक्षीताई शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास रेपाळे, माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर, मुंबईसाठी रणजी आणि आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले क्रिकेटपटू अभिषेक नायर, मुंबई आणि देशपातळीवर खेळलेले क्रिकेटपटू राजू कुलकर्णी उपस्थित असतील. दादोजी कोंडदेव स्टेडीयमच्या नुतनीकरणात सक्रीय सहभाग असणाऱ्या व्यक्तींचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.
संघ आणि त्याचे कर्णधार
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.
१. मुंबईचे मावळे - संजय जाधव, कर्णधार
२. बाणेदार ठाणे - अंकुश चौधरी, कर्णधार
३. कोकणचे वाघ - सिद्धार्थ जाधव, कर्णधार
४. खतरनाक मुळशी - प्रविण तरडे, कर्णधार
५. पराक्रमी पुणे - सौरभ गोखले, कर्णधार
६. लढवय्ये मीडिया - बवेश जानवलेकर, कर्णधार (हेड - झी टॉकीज, झी युवा)
महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) मध्ये सहभागी कर्णधार आणि कलाकारांच्या परिचयानंतर खेळपट्टीवर जाऊन स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. ही स्पर्धा दि. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना ‘बाणेदार ठाणे’ विरुद्ध ‘मुंबईचे मावळे’ यांच्यात रंगणार आहे. त्यांनतर ‘खतरनाक मुळशी’ विरुद्ध ‘लढवय्ये मिडिया’ आणि ‘मुंबईचे मावळे’ विरुद्ध ‘पराक्रमी पुणे’ हे सामने होणार आहेत.