मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून १७ फेब्रुवारीला पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथं हा कार्यक्रम होणार आहे. एकूण ८८ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुस्कार जाहीर झाला असून, साताऱ्याची प्रियंका मोहिते हिला साहसी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रियंका मोहिते हिने २०१३ साली माऊंट एव्हरेस्ट सर केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान कोणत्याही प्रकारचे वाद उद्भवू नयेत त्यासाठी समिती नेमली असून गुणांकन पद्धत अंमलात आणल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे पारदर्शक पद्धतीनं पुरस्कारांची घोषणा होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


स्मृती मंधानाचाही सन्मान


भारतीय महिला टीमची उपकर्णधार आणि सांगलीची स्मृती मंधानाचाही शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताला एकही सामना जिंकता आला नसला, तरी स्मृती मंधानानं उत्कृष्ट कामगिरी केली होती. मागच्या दोन वर्षांमध्ये स्मृती मंधानानं महाराष्ट्राचच नाही तर भारताचं नावही उंचावलं आहे. आयसीसीच्या महिली टी-२० क्रमवारीमध्ये मंधाना पहिल्या ३ खेळाडूंमध्ये आहे.