`महाराष्ट्र केसरी`ची गदा कोणाला? शैलेश शेळके-हर्षवर्धन सदगीरमध्ये अंतिम लढत
महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत, कोण पटकावणार मानाची गदा?
पुणे : अनेक धक्कादायक निकाल लागत महाराष्ट्र केसरी साठी अखेर लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत होणार आहे. माती गटात खेळणाऱ्या लातूरचा शैलेश शेळकेने सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे वर ११-१० अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला. नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत काटकेला ५-२ गुणांनी पराभूत केलं. विशेष म्हणजे शैलेश आणि हर्षवर्धन हे पुण्याच्या काका पवार यांच्या तालमीचे मल्ल आहेत.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना रंगेल. आपल्याच तालमीच्या दोन्ही मल्लांमध्ये सामना होणार असल्यामुळे आपण आनंदी असल्याची प्रतिक्रिया काका पवार यांनी दिली आहे. मागची अनेक वर्ष आमच्या तालमीचे पैलवान महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये जात होते, पण दरवेळी विजय आमच्यापासून लांब राहिला. यावेळी मात्र विजय आमचाच होणार हे निश्चित झाल्याचं काका पवार म्हणाले.
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बाला रफिक शेखने पटकावली होती. बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेला एकतर्फी मात दिली होती.