मुंबई : महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती. खेळणा-या एवढाच पाहणा-यालाही वेगळीच उर्जा देणारा अस्सल जिगरबाज  मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ आता 'महाराष्ट्र कुस्ती लीग' या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघऱात पोहोचणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी समुहाने कुस्तीच्या या नव्या रुपासाठी पुढाकार घेतलाय. सगळ्यांच्या लाडक्या झी टॉकीजवर 'महाराष्ट्र कुस्ती लीग' या भव्य स्पर्धेचे ९ ते १८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलंय.....या उपक्रमाची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एस्सेल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड भावेश जानवेलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


कुस्तीची लीग सुरु करण्याचा निर्णय सुभाष चंद्रा यांनी घेतला. मी त्यांचे आभार मानतो, असं शरद पवार म्हणाले. या लीगमधून प्रत्येक राज्यातून नवीन पैलवान येतील आणि जागतिक स्पर्धेमध्ये भारताचं नाव रोशन करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.


रिजनल चॅनलच्या माध्यमातून आम्ही देशी खेळांना प्रोत्साहन देणार आहोत. यामुळे पारंपारिक खेळांना पुन्हा जुने दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य एस्सेल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी केलं.