नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग  धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर धोनीने न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीचा महेंद्रसिंग धोनी हा ब्रँड अॅम्बेसिडर होता. मात्र, या काळात आम्रपालीने आपल्याला मिळणारे १५० कोटी रुपये दिले नसल्याचा आरोप धोनीने केला आहे. तोट्यात सुरु असलेल्या आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीकडून आपले पैसे मिळावे यासाठी धोनीने न्यायालयात खटला दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्रपाली आर्थिक संकटात आहे त्यामुळे कंपनीचे अनेक प्रोजेक्ट्सही रखडले आहेत. 


आम्रपाली विरोधात न्यायालयात खटला


इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रसिंग धोनी सोबतच क्रिकेटर्सचे एंडोर्समेंट पाहणाऱ्या रिती स्पोर्ट्सनेही आम्रपाली विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. रिती स्पोर्ट्सचे संचालक अरुण पांडे यांनी सांगितले की, "आम्रपालीने ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे पैसे दिलेले नाहीयेत." रिती स्पोर्टसचे जवळपास २२० कोटी रुपये येणं बाकी असल्याचंही अरुण पांडे यांनी म्हटलं आहे.


७ वर्ष ब्रँड अॅम्बेसिडर


महेंद्रसिंग धोनी जवळपास ६-७ वर्षांपासून आम्रपालीचा ब्रँड अॅम्बेसिडर होता. आम्रपालीचे हाऊसिंग प्रोजेक्ट पूर्ण न झाल्याने नागरिकांनी धोनी आणि आम्रपाली यांच्यावर सोशल मीडियात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर धोनीने आम्रपालीसोबतचा करार मोडण्याचा निर्णय घेतला.


वर्ल्ड कप नंतर दिलेलं आश्वासन


टीम इंडियाने २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर आम्रपालीने टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याला नोएडा येथे एक व्हिला भेट देण्याची घोषणा केली होती. आम्रपालीने यातही गडबड केली आणि धोनीला १ कोटी रुपयांचा व्हिला तर इतरांना ५५ लाख रुपयांचा व्हिला भेट दिला.