काही बोललो तर...मयंक अग्रवालला नेमकी कसली भीती?
मयांक अग्रवालला ज्या पद्धतीने LBW आऊट देण्यात आलं त्याबद्दल चाहते संतापले आहेत.
दिल्ली : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला जातोय. टीम इंडियाने पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली केली. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणलं. मात्र मयांक अग्रवालला ज्या पद्धतीने LBW आऊट देण्यात आलं त्याबद्दल चाहते संतापले आहेत.
टीम इंडियाची फलंदाजी सुरू असताना 41व्या ओव्हरमध्ये लुंगी एनगिडीने गोलंदाजीवर त्याचा चेंडू मयंक अग्रवालच्या पॅडला लागला. पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात होता आणि थोडा उंच होता. अशा स्थितीत मैदानी उपस्थित असलेल्या अंपायर्सने त्याला नॉट आऊट दिलं.
मात्र दक्षिण आफ्रिकेच्या टीमने त्यावर रिव्ह्यू घेतला. जेव्हा चेंडू थर्ड अंपायरकडे गेला त्यावेळी बॉल ट्रॅकिंगमध्ये स्टंपला बॉल लागत नसल्याचं दिसलं. परंतु असं असतानाही मयंक अग्रवालला आऊट देण्यात आलं. त्यावेळी मयंक अग्रवालही आश्चर्यचकित होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
दरम्यान या मॅचनंतर मयंक अग्रवालला यासंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी मयंक म्हणाला की, मी यावर माझं मत व्यक्त करू शकत नाही, त्यामुळे मी हे असंच सोडून देईन. कारण मी काही बोललो तर मी बॅडबुकमध्ये येईन आणि माझी मॅच फी कापली जाईल.
अशा प्रकारे आऊट दिल्यानंतर सोशल मीडियावरही लोकं संतापले. माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. जाफर म्हणाला, "चेंडू लागला नव्हता, अंपायर कॉल योग्य होता. मात्र मयंकसाठी ते अनलकी ठरला."