#MeToo:बीसीसीआयच्या `या` अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
शिस्तपालन समितीकडून स्पष्टीकरण देण्याचे आदेश
नवी दिल्ली: देशभरात गाजत असलेल्या #MeToo मोहिमेचे वादळ आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दरवाज्यावर येऊन धडकले आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेने ट्विटवरून बीसीसीआयपर्यंत ही माहिती पोहोचवली. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने राहुल जोहरी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांना यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे सीईओ होण्यापूर्वी लैंगिक शोषण केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत शिस्तपालन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी म्हटले की, सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये राहुल जोहरी यांच्याविषयी चर्चा सुरु आहे. जोहरी यांच्यावर एका अनामिक महिलेने ट्विटरच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी जोहरी एका मीडिया संस्थेत कार्यरत होते. त्याठिकाणी जोहरी यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा संबंधित महिलेचा दावा आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा बीसीसीआयशी थेट संबंध असल्याने तुर्तास आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे शिस्तपालन समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.