मुंबई : आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी आपल्या नावावर करणारी सर्वात यशस्वी टीम म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. मात्र या टीमने पंधराव्या हंगामात क्रिकेटप्रेमींची घोर निराशा केली. या हंगामात एकही सामना जिंकण्यात मुंबईला यश आलं नाही. एक दोन नाही तर सलग 8 सामने पराभूत होण्याचा अनोखा रेकॉर्ड मुंबई टीमने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्ले ऑफच्या स्पर्धेतून आधीच मुंबई टीम आपल्या खराब कामगिरीमुळे बाहेर पडली. लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईचाच पराभव झाला. लखनऊने 36 धावांनी मुंबईवर विजय मिळवला. लखनऊ विरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा रागाने लालबुंद झाला. त्याने अपयशाचं खापर फलंदाजांवर फोडलं. 


मुंबई सलग आठव्यांदा पराभवाचा सामना करत आहे. पंधराव्या हंगामात एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. आम्ही चांगली बॉलिंग केली मात्र फलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडलो. फलंदाजीमध्ये कमी पडणं हे सतत होत गेलं. खूप वाईट शॉट खेळले त्यामध्ये माझाही समावेश आहेच त्यामुळे सामना हातून गेल्याचं रोहित शर्मानं सांगितलं.


फक्त या सामन्याबद्दल नाही. संपूर्ण स्पर्धेत आम्ही खराब फलंदाजी केली. कोणताही फलंदाज जबाबदारी स्वीकारून शेवटपर्यंत खेळायला तयार नव्हता. मधल्या फळीतील फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे यावर रोहित शर्माने भर दिला. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर ईशान किशन, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि किरॉन पोलार्ड यांनी अत्यंत वाईट कामगिरी केली. 


के एल राहुलने 62 बॉलमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार ठोकून 103 धावा केल्या. के एलने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपलं दुसरं शतक ठोकलं आहे. दोन्ही शतक ही मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात केल्यानं त्याला जास्त महत्त्व आहे. 


मी परिस्थितीसा अनुसरून फलंदाजी केली. मी यशस्वी होत असल्याचा मला आनंद आहे. या मैदानातील सामने माझ्यासाठी खास ठरले आहे. सुरुवातीला सांभाळून फलंदाजी करत अंदाज घेतला. त्यामुळे मला शतकापर्यंत पोहोचणं अधिक सोपं झालं असं के एल राहुल म्हणाला.