मुंबई : नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली. पाकिस्तानच्या टीमला सेमी फायनलही गाठता आली नाही. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक मिकी आर्थर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला घरचा रस्ता दाखवला आहे. मिकी आर्थर आणि सपोर्ट स्टाफचा करार न वाढवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. मिकी आर्थर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक, अजहर महमूद बॉलिंग प्रशिक्षक, ग्रांट फ्लॉवर बॅटिंग प्रशिक्षक आणि ग्रांट लुडेन ट्रेनर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजनंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीमला प्रत्येकी ११ पॉईंट्स होते. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश झाला.


पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता मिसबाह उल हक याचं नाव आघाडीवर आहे. मिसबाहने पाकिस्तानसाठी ७५ टेस्ट, १६२ वनडे आणि ३९ टी-२० मॅच खेळला. पीसीबीचं नेतृत्व करणाऱ्या एहसान मणी यांच्या प्रशासनाला मिसबाह योग्य दावेदार वाटत आहे.


२०१० साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर मिसबाहला पाकिस्तानी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. प्रशिक्षकाच्या निवडीसाठी पीसीबी बीसीसीआयप्रमाणेच अर्ज मागवणार आहे. जर चांगला उमेदवार मिळाला तर मिसबाहला बॅटिंग प्रशिक्षकही केलं जाऊ शकतं.


पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनुसार माजी फास्ट बॉलर मोहम्मद अकरम पाकिस्तानचे बॉलिंग प्रशिक्षक होतील हे जवळपास निश्चित आहे. ४४ वर्षांचे हबीब अक्रम हे हबीब बँक लिमिटेड आणि पीएसएलच्या पेशावर जालमी टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत. २०१२ सालीही अक्रम यांची या भूमिकेसाठी नियुक्ती करण्यात आली होती.