ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त केला होता. दरम्यान या टीकेवर मिशेल मार्शने अखेर स्पष्टीकरण दिलं असून, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपला ट्रॉफीचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं मिशेल मार्शने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 नोव्हेंबरला वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून भारताचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात मिशेल मार्शने 15 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. ट्रॅव्हिस हेडने केलेल्या 137 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भावूक झालेल्या भारतीय खेळाडूंसह, मिशेल मार्शच्या सेलिब्रेशनचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मिशेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला होता. 


"त्या फोटोत मी अजिबात अनादर कृत्य केलं नव्हतं. मी त्याबद्दल फार विचार केला नाही. आता तो फोटो असाही चर्चेत नसून, प्रत्येकजण सांगत असूनही मी सोशल मीडियावर फार तो पाहिलेला नाही. त्यात विशेष असं काही नाही," असं मिशेल मार्शने SEN शी बोलताना म्हटलं.


मिशेल मार्शने यावेळी  वर्ल्डकपनंतरही काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टी-20 मालिसेसाठी भारतात थांबावं लागलं असण्यावर भाष्य केलं. "ज्यांना मागे थांबावं लागलं आहे, त्याच्यासाठी हे थोडंसं अपमानजनक आहे. पण तुम्ही ऑस्ट्रेलियासाठी खेळत असल्याने त्याचा आम्ही आदर करत असल्याने ठीक आहे. ही भारताविरोधातील मालिका असून, त्याला महत्त्व आहे. पण याच्यात एक मानवी बाजूही आहे. मुलं नुकताच वर्ल्डकप जिंकले असल्याने त्यांना सेलिब्रेशनची तसंच घरी जाऊन कुटुंबीयांनी भेटण्याची संधी द्यायला हवी होती," असं स्पष्ट मत मिशेल मार्शने म्हटलं आहे.


"यापुढे मोठ्या स्पर्धेनंतर लगेच मालिकांचं आयोजन केलं जाणार नाही अशी आशा आहे. जे मागे थांबले आहेत त्या सहा खेळाडूंसाठी मी सेलिब्रेशन केलं आहे," असं मिशेल मार्शने सांगितलं.


मिशेल मार्शने वर्ल्डकपमध्ये संघासाठी मोलाची कामगिरी निभावली. मिशेल मार्शने 10 सामन्यात 49 ची सरासरी आणि 107.56 च्या स्ट्राइक रेटने 441 धावा केल्या. यामध्ये त्याची दोन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.