मुंबई : भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत इम्रान खान यांनी भारतातल्या अल्पसंख्याक समाजाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. यावर मोहम्मद कैफनं एक ट्विट केलं आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये २० टक्के अल्पसंख्याक समाज होता. आता ही संख्या २ टक्क्यांवर आली आहे. तर भारतातली अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातल्या अल्पसंख्याकाला कशी वागणूक द्यायची याची शिकवण देणारा पाकिस्तान हा शेवटचा देश असेल, असं ट्विट मोहम्मद कैफनं केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इम्रान खान यांनी नाक खुपसलं


नसीरुद्दीन शाह यांनी आता जे म्हटलंय ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी फार पूर्वीच म्हटलंय असे इम्रान खान यांनी सांगितले. भारतात मुस्लिमांना बरोबरीची वागणूक मिळत नाही हे जिना यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती असे स्पष्टीकरणही इम्रान खान यांनी दिले. पाकिस्तानातील एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. 


अल्पसंख्याकांना समान अधिकार देण्यासाठी मोहम्मद अली जिना आग्रही होते. अल्पसंख्याकांना न्याय दिला नाही तर आंदोलन उभं राहू शकतं. पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांनाही त्यांचे अधिकार नाकारण्यात आले आणि त्यामुळेच बांगलादेशची निर्मिती झाल्याचं इम्रान खान म्हणाले. अल्पसंख्याकांना कशी वागणूक द्यायची हे आम्ही मोदी सरकारला शिकवू. भारतामध्ये आम्हाला समान अधिकार मिळत नाही, असं आता तिथले अल्पसंख्याकही म्हणत आहेत, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. 


नसिरुद्दीन शाह यांचंही प्रत्युत्तर


इम्रान खान यांना नसिरुद्दीन शाह यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. आमच्या देशात गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही आहे. त्यामुळे स्वत:चे प्रश्न कसे हाताळायचे, हे आम्हाला ठाऊक आहे, असे शाह यांनी सांगितले. 


काय म्हणाले होते नसिरुद्दीन शाह


आताच्या भारतामध्ये मला माझ्या मुलांबद्दल भीती आणि असुरक्षित वाटते. एखाद्या भडकलेल्या जमावानं माझ्या मुलांना पकडलं आणि तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम असा प्रश्न विचारला तर उत्तर देऊ शकणार नाहीत. कारण आमच्या मुलांना आम्ही धर्माचं शिक्षण दिलं नाही. समाजा-समाजांमध्ये सध्या विष पसरवलं गेलं आहे. या राक्षसाला पुन्हा बाटलीमध्ये बंद करणं कठीण होऊन बसलंय. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षाही होत नाही. बुलंदशहरमध्ये झालेल्या दंगलीबद्दल भाष्य करताना या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले होते. 


नसीरुद्दीन शाहंनंतर असद्दुद्दीन ओवेंसींनीही इम्रान यांना दाखवला आरसा