मुंबई : भारतीय बॉलर माझ्याकडून सल्ले घेतात, पण पाकिस्तानचे बॉलर सल्ला घ्यायला येत नाहीत, अशी खंत पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने व्यक्त केली आहे. मदत करण्यासाठी पाकिस्तानच्या बॉलरसाठी मी नेहमीच उपलब्ध आहे, ते माझ्याशी संपर्क करु शकतात, पण मोहम्मद शमीसारखे भारतीय बॉलर मला फोन करुन मदत मागतात, असं शोएब अख्तर म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपली बॉलिंग सुधारण्यासाठी पाकिस्तानी बॉलर मला विचारतही नाहीत, याचं मला दु:ख आहे. पण मोहम्मद शमीसारखे बॉलर मला विचारतात. माझ्या देशासाठी मला वाईट वाटतं,' असं शोएब त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीचं शोएब अख्तरने कौतुक केलं आहे. 'तू भेदक फास्ट बॉलर झालं पाहिजेस आणि टीमची बॅटिंग गुंडाळली पाहिजेस, असं मी शमीला सांगितलं. मोहम्मद शमीकडे सीम आणि स्विंग आहे, तसंच तो रिव्हर्स स्विंगही करु शकतो. उपखंडातल्या खूप कमी बॉलरना रिव्हर्स स्विंग करता येतो. शमी रिव्हर्स स्विंगचा बादशाह होऊ शकतो. विशाखापट्टणमसारख्या खेळपट्टीवर त्याने विकेट घेतल्या,' अशी प्रतिक्रिया अख्तरने दिली.


'५० ओव्हरच्या वर्ल्ड कपनंतर शमीने मला फोन केला होता. भारतासाठी चांगली कामगिरी न झाल्याचं शमीला वाईट वाटत होतं. पण मी शमीला आशा सोडू नकोस आणि फिटनेसवर लक्ष दे, असा सल्ला दिला. आता तुला घरच्या मैदानात खेळायचं आहे, तेव्हा तू चांगली कामगिरी करशील,' असं शमीला सांगितल्याचं शोएब म्हणाला.


पहिल्या टेस्टमध्ये रोहितने दोन्ही इनिंगमध्ये शतकं केली. रोहितच्या या शतकांचंही शोएबने कौतुक केलं आहे. 'रोहित शर्मा शतकामागे शतकं करत आहे. रोहित भारताच्या टेस्ट टीममध्ये असावा हे मी कधीपासून सांगत आहे. आता तो महान टेस्ट खेळाडू होईल. रोहित टेस्ट खेळाडू म्हणून मोठा होईल,' असं वक्तव्य शोएबने केलं. तसंच विराट हा बॉलरचा कर्णधार असल्याचं मतही शोएबने व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शमीने ५ विकेट घेतल्या. यातल्या ४ विकेट या बोल्ड होते.