शमीनं शेअर केलं बँक स्टेटमेंट, बायकोला द्यायचा एवढे पैसे
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली आहे.
हसीन जहां एवढे आरोप करत असली तरी मोहम्मद शमीनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मुलीसाठी हा वाद संपवण्याची इच्छाही शमीनं व्यक्त केली होती. पण हसीन जहांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे मोहम्मद शमीनंही हसनीवर आरोप करायला सुरुवात केली आहे.
मोहम्मद शमीनं माझं बँक अकाऊंट ब्लॉक केल्याचा आरोप हसीन जहांनं केला आहे. हसीन जहांच्या या आरोपावर मोहम्मद शमीनं प्रत्युत्तर दिलं आहे. मोहम्मद शमीनं त्याचं बँक स्टेटमेंटच शेअर केलं आहे. हसीन जहांन नुकतेच बँकेतून १ लाख रुपये काढले कारण तिला घर खर्चाला १ लाख रुपये पुरतात, असं शमी म्हणाला आहे.
या वादानंतर शमीनं बँक अकाऊंटमधून पैसे काढणं ब्लॉक केलं होतं. यानंतर मुलीचा आणि घरचा खर्च करता येत नसल्याचा आरोप हसीन जहांनं केला होता. याआधीही शमीनं पत्नीवर पैशांवरून आरोप केले होते. मी परदेश दौऱ्यावर असताना हसीननं मुलीच्या विम्यासाठी माझ्याकडे १५ लाख रुपये मागितले. परदेश दौऱ्यावरून आल्यावर मी कागदपत्र पाहिली असता मुलीच्या नावावर ५ लाख रुपयांचा विमा करण्यात आला होता, तर हसीननं स्वत:च्या नावावर १० लाख रुपयांचा विमा काढला होता.
दोन दिवस दुबईत होता मोहम्मद शमी
हसीन जहांच्या या आरोपानंतर बीसीसीआयचं भ्रष्टाचारविरोधी पथक आणि कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीची चौकशी केली. या चौकशीनंतर बीसीसीआयनं कोलकाता पोलिसांना रिपोर्ट दिला आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत शमी कुठे होता, याबाबतची माहिती बीसीसीआयनं पोलिसांना दिली आहे.
मोहम्मद शमी १७ आणि १८ फेब्रुवारीला दुबईत होता असं बीसीसीआयनं पोलिसांना सांगितलं. शमी दोन दिवस दुबईमध्ये काय करत होता याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. हे शमीचं वैयक्तिक आयुष्य आहे, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
२३ मार्चला हसीन जहां ममता बॅनर्जींना भेटणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हसीन जहांला भेटायची तयारी दाखवली आहे. मागच्या काही दिवसांपासून हसीन ममतांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. आता २३ मार्चला या दोघींची भेट होणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.