जसप्रीत बुमराह ऐवजी या बॉलरला टीम इंडियात संधी, ७ मॅचेसमध्ये घेतलेत २३ विकेट्स
सहा मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० ट्राय सीरिजसाठी टीम इंडियातील अनेक सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सहा मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० ट्राय सीरिजसाठी टीम इंडियातील अनेक सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
फास्ट बॉलर्सच्या जोडीला विश्रांती
टीम इंडियात सहा महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह या फास्ट बॉलर्सच्या जोडीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यासोबतच ऑलराऊंडर हार्दिक पांड्यालाही विश्रांती देण्यात आलीय. तसेच, चायना मॅन कुलदीप चहलही श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीममध्ये नाहीये.
बुमराहच्या जागेवर या खेळाडूला मिळाली संधी
जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जागेवर फास्ट बॉलर मोहम्मद सिराज याला टीममध्ये सहभागी केलयं. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मोहम्मद सिराजने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली. सिराजने दोनवेळा पाच विकेट्स घेतले. त्याने एकूण ७ मॅचेसमध्ये २३ विकेट्स घेतले.
हैदराबादमध्ये गल्ली क्रिकेट खेळणारा २३ वर्षीय मोहम्मद सिराज टीम इंडियाचा हिस्सा बनला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आयपीएलमध्ये २.६ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या मोहम्मद सिराजने आपल्या मुलाखतीत सांगितले की, ही रक्कम त्याच्यासाठी खूप मोठी आहे. त्याला आपल्या क्रिकेट करिअरमध्ये पहिलं बक्षीस ५०० रुपयांचं मिळालं होतं.
विजय शंकरवर सर्वांच्या नजरा
टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालयं. विजय शंकर याला याआधी २०१७ मध्ये भारतीय टेस्ट टीममध्ये संधी मिळाली होती. पण तो खेळणा-या अकरा खेळाडूंमध्ये जागा मिळवू शकला नाही.