`शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर आमिरकडून फिक्सिंगची कबुली`
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे.
मुंबई : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये आमिरने ५ विकेट घेतल्या. स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी मोहम्मद आमिरवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर मोहम्मद आमिरने स्पॉट फिक्सिंगची कबुली दिली होती, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याने केलं आहे.
आमिरसोबत दोषी ठरवण्यात आलेला सलमान बट २०१० सालच्या इंग्लंड दौऱ्याआधीपासूनच फिक्सिंग करायचा असा आरोपही रझाकने केला आहे. अब्दुल रझाक जीएनएन समाचार चॅनलशी बोलत होता.
'आफ्रिदीने मला खोलीतून बाहेर जायला सांगितलं. पण काही वेळानंतर मी कानाखाली मारल्याचा आवाज ऐकला, यानंतर आमिरने सगळं खरं सांगितलं,' असं रझाक म्हणाला.
पाकिस्तानचं नाव खराब करण्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार असल्याची प्रतिक्रिया रझाकने दिली. 'आयसीसीकडे जाण्याऐवजी पीसीबीने स्वत: या तिघांना घरी पाठवायला पाहिजे होतं. त्यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली पाहिजे होती. पीसीबीने असं केलं नाही आणि यामध्ये पाकिस्तानची इज्जत गेली,' असं रझाक म्हणाला.
'सलमान बट हा आधीपासूनच फिक्सिंग करत होता. सलमान बट मुद्दाम डॉट बॉल खेळायचा. आफ्रिदीलाही मी याबद्दल सांगितलं. पण त्यावेळी तुझा गैरसमज झाला आहे, काहीही चुकीचं होत नसल्याचं मला आफ्रिदी म्हणाला. पण टी-२० वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मी बटबरोबर बॅटिंग करत होतो, तेव्हा त्याने टीमला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. मी बटला मला स्ट्राईक द्यायला सांगितलं. पण त्याने याला नकार दिला. हे ऐकून मी हैराण झालो. तेव्हा मला तो नक्की काय करतोय, हे समजलं. जाणूनबुजून तो ओव्हरमधले दोन-तीन बॉल डॉट खेळत होता.. यानंतर मला स्ट्राईक द्यायचा. मला राग आला होता आणि मी दबावात आऊट झालो,', असं रझाकने सांगितलं.