मुंबई : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पश्चिम बंगालच्या अलीपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. शमीविरुद्धच्या अटक वॉरंटला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एका आठवड्यापूर्वी शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमदविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने शमीला १५ दिवसात आत्मसमर्पण करायला सांगितलं. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्याविरुद्ध हुंडा आणि हिंसाचाराचा आरोप करत केस दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सहा महिन्यांनी मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं. मागच्या वर्षी मार्च महिन्यात हसीन जहांने शमीवर हिंसाचार, बल्ताकार, हत्येचा प्रयत्न आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. यानंतर शमीला देशाबाहेर जाऊन क्रिकेट खेळण्यासाठीही न्यायलयाची परवानगी लागली. या कारणामुळे अमेरिकेचा व्हिजा मिळवण्यासाठीही शमीला अडचणी आल्या. पण बीसीसीआयने दखल दिल्यामुळे शमीला व्हिजा मिळाला.


मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून आल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. हसीन जहांने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून शमीने महिलांशी केलेल्या व्हॉट्सऍप चॅटचे स्क्रीनशॉट शेयर केले. शमीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप हसीन जहांने केला. शमीने हसीन जहांने केलेले हे सगळे आरोप फेटाळून लावले. याप्रकरणाची पुढची सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.


दोन महिन्याआधी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये शमीने शानदार कामगिरी केली. फक्त ४ मॅच खेळून शमीने १४ विकेट घेतल्या. यामध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या हॅट्रिकचाही समावेश आहे. नंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात शमीला जास्त विकेट मिळाल्या नाहीत. या सीरिजमध्ये शमीने १५०वी टेस्ट विकेटही घेतली. ७० वनडेमध्ये शमीने १३० विकेट घेतल्या आहेत.